जळगाव - सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकासह त्याच्या मुलाने स्मशानभूमीत अंत्यसंस्कारावेळी वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बेकायदेशीरपणे बंदुकीतून फायरिंग केली. दोन गोळ्या झाडल्यानंतर तिसऱ्या वेळी बंदूक लॉक होऊन अचानक गोळी सुटली. ही गोळी लागल्याने अंत्ययात्रेसाठी आलेले तुकाराम बडगुजर (६०) यांचा मृत्यू झाला.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल श्रावण मोहकर यांचे वडील श्रावण बारकू मोहकर (८५) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. अंत्ययात्रा स्मशानभूमीत आल्यावर श्रावण मोहकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचा मुलगा सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहकर यांनी आपल्या बंदुकीमधून हवेत एक फायर केले. त्यानंतर विठ्ठल मोहकर यांच्या मोठ्या मुलाने दुसरा फायर केला. दुसऱ्या फायरनंतर मोहकर यांचा लहान मुलगा दीपकने फायर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिसऱ्या फायरला बंदूक लॉक झाली. त्यामुळे दीपक बंदूक आडवी करून तिला तपासत असतानाच बंदुकीतून अचानक गोळी सुटून ती अंत्ययात्रेत आलेले बडगुजर यांना लागली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बडगुजर यांना मृतावस्थेत जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर आज दुपारी बडगुजर यांच्यावर पिंपळगाव हरेश्वरयेथे अंत्यसंस्कार करण्यात आले.