जळगाव- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज ( मंगळवार) उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे त्यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आवश्यक असणारा एबी फॉर्म नव्हता. असे असतानाही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या मागचे कारण होते आजचा मुहूर्त ! आज मुहूर्त चांगला असल्याने खडसेंनी एबी फॉर्म शिवायच उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा -आदित्य ठाकरे वरळीतून मैदानात, ठाकरे घराण्याची परंपरा मोडीत
विशेष म्हणजे भाजपने १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. खडसे मुक्ताईनगर मतदार संघातून अर्ज भरत असतानाच ही यादी जाहीर करण्यात आली. त्या यादीत खडसेंचे नाव नव्हते. याची त्यांना कल्पना नव्हती. अर्ज भरून आल्यानंतर त्यांना याची माहिती मिळाली. त्यावर त्यांनी पक्षश्रेष्ठीं बरोबर बोलू असे सांगितले. शिवाय दुसऱ्या यादीत स्थान मिळेल असा अशावाद ही त्यांनी व्यक्त केला.
... म्हणून संभाजी भिडे बुद्धांना घाबरतात, त्यांची विचारसरणी विषारी -तुषार गांधी
दरम्यान, भाजपने अजून कोणत्याही इच्छुक उमेदवारांना ए. बी. फॉर्म वाटप केलेला नसताना खडसे आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ते पक्षावर दबाव आणत आहेत का? अशी चर्चा जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून एकनाथ खडसे भाजपकडून प्रमुख इच्छुक आहेत. मात्र, भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर पक्षाकडून त्यांची वेळोवेळी मुस्कटदाबी झाल्यानंतर खडसेंच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी त्यांच्या कन्या तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या नावाची चर्चा आहे.
मनसेत भरती सुरू, विधानसभेसाठी लढवणार 150 जागा
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे देखील इच्छुक आहेत. पाटील आणि खडसे यांच्यात हाडवैर असून त्याचे पडसाद यावेळीही उमटणार असल्याची चिन्हे आहेत. भाजप सेनेत युती झाली आणि याठिकाणी खडसे उमेदवार राहिले तरी आपण अपक्ष उमेदवारी करू, अशी भूमिका घेऊन चंद्रकांत पाटलांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.