जळगाव -राजधानी एक्सप्रेसला भुसावळ रेल्वे स्थानकावर तांत्रिक थांबा देण्यात यावा, अशी मागणी माजी मंत्री एकनाथ खडसे आणि खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. एकनाथ खडसे आणि खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय मंत्री गोयल यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ही मागणी केली आहे.
आठवड्यातून चार दिवस राजधानी एक्स्प्रेस मध्य रेल्वे विभागातून सुरू आहे. राजधानी एक्सप्रेसमुळे जळगाव ते दिल्ली अंतर अत्यंत कमी वेळात पार पडत असल्यामुळे, जळगाव जिल्ह्यातील उद्योजक, विद्यार्थी, प्रवाशांना सुविधा मिळत आहे. त्यामुळे ही गाडी रोज सुरू करावी, अशी मागणी देखील खडसे यांनी केली. राजधानी एक्सप्रेसविषयी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता अधिकाऱ्यांनी जळगाव येथे थांबा असल्यामुळे तांत्रिक अडचणी येत आहेत. जळगाव स्थानकावर रेल्वे गाडीत पाणी भरणे, चालक दल बदलणे या सुविधा उपलब्ध नाहीत. या सुविधा जळगाव स्थानकावर उपलब्ध करून देण्यासाठी भरपूर वेळ आणि निधीची तरतूद करावी लागेल. जळगाव हे जंक्शन असल्याने पश्चिम रेल्वेकडून नागपूरकडे जाणारी मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक सुरू असते.