जळगाव- येथील गोदावरी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मरणयातना सहन कराव्या लागत असल्याचे एका धक्कादायक घटनेतून समोर आले आहे. चाळीसगाव येथील एका महिला रुग्णासह तिच्या नातेवाईकांना या रुग्णालयात शनिवारी मध्यरात्री अत्यंत वाईट अनुभव आला. मध्यरात्रीची वेळ असताना महिला रुग्णाला उपचार तर मिळालेच नाहीत, उलट बाहेर मुसळधार पाऊस पडत असल्याने त्यांना गुडघाभर पाणी साचलेल्या 'कॅज्युअल्टी' वॉर्डातच रात्र जागून काढावी लागली. या घटनेमुळे जनमानसातून तीव्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने येथील जिल्हा रुग्णालय हे विशेष कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. तर जिल्हा रुग्णालय हे सुरुवातीला जळगाव शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित केले होते. ते पुन्हा बदलून जळगावातील शाहू रुग्णालयात स्थलांतरित केले आहे. या निर्णयाची माहिती नसल्याने ग्रामीण भागातील लोकांना खूप फटका सहन करावा लागत आहे. असाच काहीसा प्रकार शनिवारी रात्री घडला. चाळीसगाव येथे राहणारे एस.टी. कर्मचारी आबा नालकर यांची बहीण मंदा राखुंडे यांची प्रकृती खराब असल्याने त्यांच्यावर चाळीसगावातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना गोदावरी हॉस्पिटलमध्ये हलविण्यास सांगितले.
मंदा राखुंडे यांना घेऊन त्यांचे नातेवाईक रात्री 11 वाजेच्या सुमारास गोदावरी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. परंतु, तेथील कर्मचाऱ्यांनी कोणतेही सहकार्य न करता त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यास मनाई केली. बराच वेळ विनवण्या केल्यानंतर तेथील नर्सने केसपेपर काढून दिला. पण 2 तास उलटूनही डॉक्टर्स उपचारासाठी आलेच नाहीत. याच दरम्यान, मुसळधार पाऊस सुरू झाल्याने त्यांना बाहेर दुसऱ्या हॉस्पिटलमध्येही जाता येत नव्हते. म्हणून त्यांनी हॉस्पिटलमध्ये थांबण्यास परवानगी द्यावी म्हणून विनंती केली. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांनी अरेरावी केली.
बाहेर रात्रीचा मुसळधार पडणारा पाऊस, काळाकुट्ट अंधार, रुग्णास होणाऱ्या वेदना हा सर्व अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार मंदा राखुंडे यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी अनुभवला. बराच वेळ विनवण्या केल्यावर त्यांना हॉस्पिटलच्या 'कॅज्युअल्टी' वॉर्डमध्ये थांबण्यास परवानगी मिळाली. मात्र, त्या वॉर्डमध्ये पावसाचे पाणी गुडघाभर साचले होते. राखुंडे यांना एका स्ट्रेचरवर झोपवून नातेवाईक रात्रभर तसेच थांबले. तिथे प्रचंड गोंधळ सुरू होता. त्या वॉर्डमध्ये आधीच दाखल झालेल्या एका परिवाराचा आक्रोश सुरू होता. उपचार न मिळाल्यामुळे एका विषबाधित अल्पवयीन तरुणीचा देखील येथे मृत्यू झाल्याचा आरोप राखुंडे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. संपूर्ण रात्र या भयभीत परिवाराने तशा अवस्थेत काढल्यानंतर रविवारी सकाळी 6 वाजता त्यांनी काही समाजसेवकांशी संपर्क साधून आपबिती कथन केली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याशी संपर्क झाला.