महाराष्ट्र

maharashtra

रब्बीची पेरणी जळगाव जिल्ह्यात अंतिम टप्प्यात; सूर्यफुलाची सुमारे 300 हेक्टरवर लागवड

By

Published : Dec 22, 2020, 3:12 PM IST

Updated : Dec 22, 2020, 3:20 PM IST

यावर्षी सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात असल्याने रब्बीचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 ते 15 टक्क्यांनी वाढले आहे. जिल्ह्यात यावर्षी सुमारे अडीच लाख हेक्टरवर रब्बीचा पेरा आहे.

Jalgaon
Jalgaon

जळगाव -जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. सद्यस्थितीत 80 ते 85 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. यावर्षी सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात असल्याने रब्बीचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 ते 15 टक्क्यांनी वाढले आहे. जिल्ह्यात यावर्षी सुमारे अडीच लाख हेक्टरवर रब्बीचा पेरा आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र हे हरभऱ्याचे तर, त्या खालोखाल मक्याचे क्षेत्र आहे.

डिसेंबरअखेर गव्हाची पेरणी

जळगाव जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात वार्षिक सरासरीच्या 162 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे विहिरी, कूपनलिका, नद्या तसेच इतर स्त्रोतांना मुबलक पाणीसाठा आहे. पाणी उपलब्ध असल्याने शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला जोमाने लागले. रब्बीच्या लागवडीसंदर्भात 'ईटीव्ही भारत'शी बोलताना कृषी उपसंचालक अनिल भोकरे म्हणाले, की जिल्ह्यात एकूण साडेसात लाख हेक्‍टरवर खरीप हंगामात पेरणी होते. त्यातील जवळपास सव्वा ते दीड लाख हेक्‍टरवर दरवर्षी रब्बी हंगामाची पेरणी होते. यावर्षी पाणी उपलब्ध असल्याने रब्बीच्या पेरणीत 50 ते 75 हजार हेक्‍टरने वाढ झाली आहे. कृषी विभागाने यावर्षी दोन ते सव्वादोन लाख हेक्टरवर रब्बी हंगामाची पेरणी होईल, असा अंदाज सुरुवातीला वर्तवला होता. मात्र, प्रत्यक्षात रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. अडीच लाख हेक्टरपर्यंत रब्बीची पेरणी होईल, असा अंदाज आहे. कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी दिवाळीच्या काळातच कापूस उपटून फेकला. कापसाच्या जागी मका, हरभरा पेरला. त्यामुळे रब्बीचे क्षेत्र वाढले. आता डिसेंबर अखेरपर्यंत बागायती कापसाचे क्षेत्र रिकामे होऊन त्यावर गव्हाची पेरणी होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.

हरभऱ्याचे सर्वाधिक क्षेत्र

यावर्षीदेखील रब्बी हंगामात सर्वाधिक क्षेत्र हे हरभऱ्याचे आहे. रब्बीच्या एकूण अडीच लाख हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे 70 ते 80 हजार हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. त्याखालोखाल क्षेत्र हे मका पिकाचे आहे. 40 ते 45 हजार हेक्टरवर मका लागवड झाली आहे. याशिवाय गहू 17 ते 18 हजार हेक्टर तसेच 20 ते 22 हजार हेक्टरवर दादरची लागवड झाली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कापसाच्या जागी गव्हाची पेरणी होईल. त्यामुळे गव्हाचे क्षेत्र 5 ते 7 टक्क्यांनी अजून वाढेल, असेही अनिल भोकरे यांनी सांगितले.

सूर्यफूलाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ

यावर्षी रब्बी हंगामात सूर्यफूलाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 5 ते 7 वर्षांपासून पाण्याअभावी रब्बीच्या हंगामावर परिणाम होत होता. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडत असल्याने रब्बीसाठी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत यावर्षी जिल्ह्यात सूर्यफूलाची लागवड वाढली आहे. जिल्ह्यातील गिरणा खोऱ्याचा प्रदेश असलेल्या चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जळगाव तसेच धरणगाव तालुक्यात ठिकठिकाणी सूर्यफुलाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. जिल्ह्यातील 300 ते 350 हेक्टरवर सूर्यफुलाची लागवड झाली आहे.

टरबूज, खरबूज लागवडीला पसंती

पाण्याची उपलब्धता असल्याने जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी टरबूज तसेच खरबूज या पिकांच्या लागवडीलादेखील पसंती दिल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी अनेक शेतकर्‍यांना टरबूज, खरबुजाची लागवड फायदेशीर ठरली होती. हा पूर्वानुभव लक्षात घेता अनेकांनी यावर्षी देखील टरबूज, खरबूज लागवड केली आहे.

उन्हाळी कांदा व बाजरीचे क्षेत्र राहणार सरासरी

जिल्ह्यात यावर्षी उन्हाळी कांदा व बाजरीचे क्षेत्र सरासरी राहण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात कांद्याची लागवड पूर्ण होऊ शकते. तर जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात बाजरीची पेरणी अंतिम टप्प्यात येईल. जिल्ह्यातील चाळीसगाव, अमळनेर, चोपडा, धरणगाव, यावल तालुक्यात कांद्याची मोठ्या प्रमाणावर होते. त्याचप्रमाणे, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, अमळनेर, चोपडा या तालुक्यांमध्ये उन्हाळी बाजरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

Last Updated : Dec 22, 2020, 3:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details