महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावातील रुग्णालयांकडून बायोमेडिकल वेस्टच्या नावाखाली रुग्णांची लूट - जळगाव कोरोना अपडेट

जळगावातील खासगी रुग्णालयांकडून बायोमेडिकल वेस्टच्या नावाखाली रुग्णांची लूट होत आहेत. या प्रकारासंदर्भात जळगावातील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी रुग्णांची होणारी लूट थांबवण्याची मागणी केली आहे.

Private hospitals in Jalgaon are charging higher fees from patients under the guise of biomedical waste.
जळगावातील खासगी रुग्णालयांकडून बायोमेडिकल वेस्टच्या नावाखाली रुग्णांची लूट

By

Published : May 21, 2021, 8:13 PM IST

Updated : May 21, 2021, 8:20 PM IST

जळगाव - शहरासह जिल्ह्यातील काही खासगी कोविड रुग्णालयांकडून बायोमेडिकल वेस्टच्या नावाखाली रुग्णांची आर्थिक लूट केली जात आहे. प्रत्येक रुग्णाच्या वैद्यकीय बिलात बायोमेडिकल वेस्टसाठी हजारो रुपये अतिरिक्त घेतले जात आहेत. या माध्यमातून खासगी रुग्णालये आपले उखळ पांढरे करत आहेत. या प्रकारासंदर्भात जळगावातील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी, राज्याचे मुख्य सचिव तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली असून, रुग्णांची होणारी लूट थांबवण्याची मागणी केली आहे.

जळगावातील रुग्णालयांकडून बायोमेडिकल वेस्टच्या नावाखाली रुग्णांची लूट

बायोमेडिकल वेस्टमध्ये रुग्णालयातील वापरून झालेल्या सलाईनच्या बाटल्या, इंजेक्शन्स, पीपीई किट, रुग्णांच्या जेवणाचे डिस्पोजेबल ताट, ग्लास अशा साहित्याचा समावेश होतो. कोविड रुग्णालयांमधून निघणाऱ्या बायोमेडिकल वेस्टची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे अत्यंत गरजेचे असते. तसे झाले नाही तर कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता असते. नियमानुसार बायोमेडिकल वेस्टचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ही संबंधित रुग्णालयासह, ते रुग्णालय ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखत्यारीत येते, त्याची असते. खासगी कोविड रुग्णालयांकडून सध्या बायोमेडिकल वेस्टच्या नावाखाली रुग्णांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केली जात आहे. खासगी रुग्णालये प्रतिदिन 500 ते 600 रुपये याप्रमाणे रुग्णांकडून शुल्क आकारत आहेत. हे शुल्क अवाजवी असून, त्यावर शासनाने नियंत्रण आणणे गरजेचे आहे.

रुग्णांकडून हजारो रुपयांची वसुली-

बायोमेडिकल वेस्ट संदर्भात खासगी रुग्णालयांचे शुल्क निश्चित करताना जिल्हा प्रशासनाने, प्रत्येक रुग्णाकडून 500 ते 600 रुपये घेण्याचे निश्चित केले आहे. मात्र, खासगी रुग्णालये रुग्णांची सर्रास लूट करत आहेत. रुग्णांकडून 500 ते 600 रुपये प्रतिदिन बायोमेडिकल वेस्टसाठी शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे रुग्णाला डिस्चार्ज मिळेपर्यंत त्याच्या बिलात 5 हजार रुपयांपासून 15 ते 20 हजारापर्यंतचा अतिरिक्त बोजा पडत आहे, असे तक्रारदार दीपककुमार गुप्ता यांचे म्हणणे आहे.

बेड चार्जमध्येच असावा बायोमेडिकल वेस्टच्या शुल्काचा समावेश-

कोरोनाबाधित रुग्णांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी राज्य शासनाने कोरोनाच्या उपचाराचे शुल्क निश्चित केले आहे. यात रुग्णांच्या बेडसह विविध चाचण्यांचे दर निश्चित केले आहेत. रुग्णांच्या बेडसाठी जे शुल्क आकारले जाते; त्यातच बायोमेडिकल वेस्टच्या शुल्काचा समावेश असावा. जेणेकरून रुग्णांची आर्थिक लूट होणार नाही, अशी मागणीही दीपककुमार गुप्ता यांनी केली आहे.

आयएमएची भूमिका -

या प्रकारासंदर्भात आयएमएच्या जळगाव शाखेचे सचिव डॉ. राधेश्याम चौधरी यांनी सांगितले की, बायोमेडिकल वेस्टचे संकलन करणारी ठेकेदार कंपनी प्रत्येक खासगी रुग्णालयांकडून बायोमेडिकल वेस्टचा ट्रान्सपोर्ट खर्च अवाजवी आकारत आहे. याबाबत आयएमएने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना कल्पना दिली आहे. या अवाजवी आकारणीचा भार अप्रत्यक्षपणे रुग्णांवर येत असतो. त्यामुळे शासनाने जे दर निश्चित करून दिले आहेत, तसेच ज्या मार्गदर्शक सूचना आहेत, त्याप्रमाणे खासगी रुग्णालयांनी शुल्क आकारणी करणे अपेक्षित असल्याचे डॉ. चौधरी म्हणाले.

कोविड रुग्णालयांना जिल्हाधिकाऱ्यांची तंबी -

बायोमेडिकल वेस्टचे व्यवस्थापन हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बायोमेडिकल वेस्टचे व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने होणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, हे करत असताना बायोमेडिकल वेस्टच्या नावाखाली रुग्णांवर अतिरिक्त आर्थिक भार येणार नाही, याची काळजी खासगी रुग्णालयांनी घ्यायला हवी. या प्रकारासंदर्भात जिल्हा प्रशासनाला तक्रार प्राप्त झाली आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्तांना निर्देश देण्यात आलेले आहेत. महापालिका आयुक्त तातडीने खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तसेच आयएमएच्या पदाधिकाऱ्यांसोबत एकत्रित बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावतील, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

Last Updated : May 21, 2021, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details