जळगाव-जिल्ह्यातील रावेर तालुक्यात बुधवारी रात्री अडीचनंतर वादळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रावेर तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. सर्वाधिक नुकसान हे निंभोरा, वडगाव, विवरा, वाघोदा आणि चिनावल आदी गावांच्या परिसरात झाले आहे.
रावेर तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी पाऊस... केळी बागांचे मोठे नुकसान - केळी बाग जळगाव बातमी
रावेर तालुक्यातील निंभोरा, वडगाव, विवरा, वाघोदा यासह चिनावल व कुंभारखेड्याच्या काही भागात आलेल्या जोरदार वादळासह पावसामुळे 10 ते 12 किलोमीटरच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
गेल्या आठवड्यात 300 ते 350 रुपये दरावरुन केळीचे बाजारभाव चांगल्याच तेजीत येण्याचे संकेत होते. तसेच 700 ते 800 रुपयांपर्यंत केळीची खरेदी सुरू झाली. त्यातच पावसामुळे केळी बागांचे नुकसान झाल्याने या पट्ट्यातील केळी उत्पादक पुरते हादरले आहेत. वारा इतक्या वेगात होता की, शेतातील मोठमोठी झाडे उन्मळून पडले. वीजतारा व वीज खांब वाऱ्याच्या वेगात आडवे झाले. दरम्यान, 10 ते 12 किलोमीटरच्या या पट्ट्यात हा वादळ पाऊस होता. या वादळात शेकडो शेतकऱ्यांची हजारो क्विंटल केळीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या वादळाची नोंद घेत पंचनाम्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.