जळगाव - खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतकरी गट तसेच उत्पादक कंपन्यांमार्फत बी-बियाणे व खते बांधापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना बियाणे व खते या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणार असली तरी त्यांनी बागायती कापसाची लागवड 25 मे नंतरच करावी. तसेच बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज तातडीने उपलबध करुन द्यावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अजिंठा शासकीय विश्रामगृहात पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी वैभव शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक अरुण प्रकाश, विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता शेख, जळगाव जिल्हा मध्यवती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात कापूस पिकाखालील लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. बागायती कापसाची लागवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना पिकाला पाणी देता यावे, म्हणून वीज वितरण कंपनीने लागवडीच्या काळात आठवड्यातून किमान चार दिवस वीज उपलब्ध करुन द्यावी. वीज वितरणाचे वेळापत्रक बदलण्यासाठी आवश्यकता भासल्यास उर्जामंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान तातडीने उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रयोगशाळा तयार कराव्यात. याशिवाय शेतकऱ्यांना लावगडीसाठी भांडवलाची आवश्यकता असते, ही बाब लक्षात घेत बँकांनी लवकरात लवकर पीककर्जाचे वाटप करावे. कर्जाचे वाटप करताना शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला दिलेत.त्याचबरोबर पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होवू नये, यासाठी गिरणा धरणातून एक आर्वतन पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात.