जळगाव - कंकणाकृती सूर्यग्रहणाचा दुर्मिळ योग अनुभवण्याची संधी गुरुवारी जळगावातील नागरिकांसह खगोलप्रेमींना मिळाली. जळगावात सकाळी 8 वाजून 7 मिनिटांनी कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळाले. ढगाळ वातावरणामुळे पूर्ण वेळ सूर्यग्रहण पाहता आले नाही, त्यामुळे नागरिकांच्या उत्सुकतेवर विरजण पडले. मात्र, काही खगोलप्रेमींनी या खगोलीय घडामोडींचे निरीक्षण नोंदवण्यासाठी अत्याधुनिक दुर्बिण उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना विशेष पद्धतीने सूर्यग्रहण अनुभवता आले.
जळगावात मूळजी जेठा महाविद्यालयातील भूगोल विभाग तसेच जळगाव खगोल ग्रुपतर्फे खगोलप्रेमींसाठी महाविद्यालयाच्या छतावर १२ इंचाच्या टेलिस्कोपमधून सोलर फिल्टरद्वारे सूर्यग्रहण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी ८ वाजून ७ मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात झाली. ९ वाजून २५ मिनिटांनी चंद्राने सूर्याला ६८ टक्के झाकले होते. त्यानंतर ग्रहण सुटायला सुरुवात झाली आणि ११ च्या सुमारास ग्रहण संपले, अशी माहिती खगोल अभ्यासकांनी दिली.