जळगाव - तीव्र उष्णतेमुळे टायर फुटल्याने चारचाकी उलटली. या अपघातात रावेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या बहिणीचा मृत्यू झाला. तर चालकासह त्यांच्या कुटुंबातील सहा जण जखमी झाले. उलटलेल्या चारचाकीवर समोरुन येणारी दुचाकी आदळल्याने दुचाकीस्वार देखील ठार झाला. दुचाकीवरील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी दुपारी ३ च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर पाळधी गावाजवळ घडला.
माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या बहिणीचा अपघाती मृत्यू
दुचाकीवरील दुसरा तरुण चेतन लक्ष्मण पाटील (वय २३, रा. आसोदा) हा गंभीर जखमी झाला आहे.
स्नेहजा उर्फ स्नेहलता प्रेमानंद रुपवते (वय ६४, रा. मुंबई) असे अपघातात ठार झालेल्या माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या बहिणीचे नाव आहे. तर दुचाकीस्वार वासुदेव दशरथ माळी (वय २८, रा. आसोदा) हा देखील या अपघातात ठार झाला आहे. दुचाकीवरील दुसरा तरुण चेतन लक्ष्मण पाटील (वय २३, रा. आसोदा) हा गंभीर जखमी झाला आहे. तर चारचाकीमध्ये बसलेले मृत रुपवेत यांची मुलगी उत्कर्षा प्रशांत सैलानी (वय २८), त्यांचे पती प्रशांत सैलानी (वय ४१) मुलगा साहस (वय ३), दुसरी मुलगी बंधमुक्ता खान (वय ४१), त्यांची मुलगी उन्मीद (वय १३) व चारचाकी चालक अशपाक शेख (वय ३२, सर्व रा.मुंबई) हे जखमी झाले आहेत.
माजी आमदार चौधरी यांची मुलगी यज्ञा हिचा शनिवारी (११ मे) खिरोदा येथे विवाह सोहळा पार पडला. या लग्नसमारंभासाठी त्यांच्या बहिण स्नेहजा या दोन मुली, जावई व नातवंडांसह खिरोद्याला आल्या होत्या. दरम्यान, रविवारी सकाळी मुंबईला जाण्याअगोदर हे सर्वजण मुक्ताईनगर येथे मुक्ताई मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तेथून दुपारी त्यांनी परतीच्या प्रवासाला सुरूवात केली. धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळील साई मंदिरासमोर उष्णतेमुळे त्यांच्या चारचाकीचे टायर फुटले. यामुळे चारचाकी उलटली. दरम्यान, याचवेळी या चारचाकीच्या समोरुन दुचाकीवरुन वासुदेव माळी व चेतन पाटील हे दोघे येत होते. त्यांची दुचाकी चारचाकीस धडकली. यामुळे दोघे गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असताना वासुदेव यांचा मृत्यू झाला. चारचाकी चालक अशपाक व दुचाकीवरील चेतन हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात आयसीयूत उपचार सुरू आहेत.