जळगाव - जिल्ह्यातील १५ पंचायत समिती सभापती व १३४ सदस्यांनी सोमवारी सामूहिक राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. योग्य सन्मान न मिळणे, विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याने एकप्रकारे पंचायत समिती सभापती व सदस्यांच्या अधिकारांवर गंडांतर आणले गेले आहे. त्याचा निषेध म्हणून सभापती व सदस्यांनी सामूहिक राजीनामा देण्याची टोकाची भूमिका घेतली आहे.
महाराष्ट्र पंचायत समिती सदस्य संघर्ष समितीची बैठक जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात पार पडली. या बैठकीत हा निर्णय झाला. पंचायत समिती सभापती व सदस्यांच्या अधिकारांवर कात्री लावण्यात आल्याने हवा तो सन्मान मिळत नाही. तसेच विकासकामांना निधीच नसल्याने कामे करायची कशी ? त्यामुळे नावाला पद मिरवण्यापेक्षा पंचायत समित्याच बरखास्त कराव्यात, असा सूर या बैठकीत उमटला.
यावेळी महाराष्ट्र पंचायत समिती संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिंदे (तुळजापूर), शिरीष पटेल यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. लग्नात सरपंचांना 'या... बसा...' असे म्हटले जाते. मात्र, आपल्याला तीदेखील विचारणा होत नाही. पुढच्या वेळी आपल्याला लग्नाचेही निमंत्रण नसेल, अशी वेळ आल्याची खंत शिरीष पटेल यांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत पदाधिकारी विचारत नाहीत, जिल्हा परिषदेचे पदाधिकारीही आपले ऐकत नाहीत. आपण मध्येच अडकून पडलो आहोत, अशी उद्विग्न भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.