जळगाव -जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत आहे. या समस्येवर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने 10 ठिकाणी कृत्रिम ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यातील 5 प्लांट हे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तर उर्वरित 5 प्लांट राज्य आपत्ती निवारण योजनेच्या माध्यमातून उभारले जाणार आहेत. पुढील दीड ते दोन महिन्यात हे प्लांट उभारले जातील. त्यानंतर जिल्हा ऑक्सिजन समस्येवर मात करू शकणार आहे. ऑक्सिजन प्लांट उभारणी संदर्भात प्रशासकीय प्रक्रियेला गती आली आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट ही आधीच्या लाटेपेक्षा अधिक तीव्र असल्याने रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यातील रुग्ण संख्येचा विचार केला तर जिल्ह्यात 9 हजार 712 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातील 1 हजार 227 रुग्ण हे ऑक्सिजन प्रणालीवर तर 744 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. एवढ्या रुग्णसंख्येसाठी 24 तासात साधारणपणे 38 ते 40 मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजनची गरज भासत आहे. यातून साडेतीन ते चार हजार जम्बो ऑक्सिजन सिलिंडर आवश्यक असतात. परंतु, आवश्यक असलेल्या ऑक्सिजनसाठी उपलब्ध होणारा लिक्विड ऑक्सिजन हा कमी पडतो. दररोज सुमारे 8 ते 10 मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजनचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन करताना जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागते. ऑक्सिजन तुटवड्याच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाय म्हणून तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट उभारण्याचे नियोजन केले आहे.
प्लांटसाठी प्रशासकीय पातळीवर आली गती-
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी लागणाऱ्या कृत्रिम ऑक्सिजनची टंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्लांट उभारण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. पुढील दीड ते दोन महिन्यात हे प्लांट कार्यान्वित होतील, या अनुषंगाने उपाययोजना केल्या जात आहेत. प्लांट उभारणीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी ई-टेंडरिंगच्या तांत्रिक बाबींमध्ये न अडकवता अगोदर मंजूर झालेल्या दराने साहित्य खरेदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या संदर्भातील प्रस्तावामध्ये असलेल्या तांत्रिक चुकांची दुरुस्ती देखील युद्धपातळीवर करण्यात आली आहे. प्रस्तावांना सुधारित मान्यता देण्यात आली असून, प्लांट उभारण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
हेही वाचा -कोरोनाला हरवायला लसच आपल्याला मदत करेल, घरी पोहोचताच धवनने गाठलं लसीकरण केंद्र