जळगाव -कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच असल्याने जिल्ह्यात ऑक्सिजन सिलिंडरची मागणी पूर्वीच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा अधिक आहे. ऑक्सिजनची मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत असल्याने आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. मागणी वाढल्यामुळे ऑक्सिजन सिलिंडरचे दरही दुप्पट ते तिप्पट पटीने वाढले आहेत. सध्या एका जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचा दर 500 ते 600 रुपये आहे. तीन महिन्यांपूर्वी कोरोना संसर्गाचा वेग मंदावलेला असताना हेच दर 200 ते 250 रुपये होते.
दिवसाला 40 टन कृत्रिम ऑक्सिजनची गरज
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. दररोज एक हजारांच्या घरात नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत असल्याने आरोग्य यंत्रणा अक्षरशः हतबल झाली आहे. वाढीव रुग्णसंख्येमुळे उपचारासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा तसेच औषधांचा तुटवडा जाणवत आहे. सर्वात जास्त तुटवडा आहे तो ऑक्सिजनचा. सध्या जिल्ह्यात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 12 हजारांच्या उंबरठ्यावर आहे. त्यात दीड हजारांवर रुग्ण हे ऑक्सिजन प्रणालीवर, तर 800 पेक्षा अधिक रुग्ण अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. एवढ्या रुग्णसंख्येसाठी दररोज जिल्ह्यात किमान 40 टन लिक्विड ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. त्यासाठी जिल्ह्यात लिक्विड ऑक्सिजन गॅस साठवणूक करण्यासाठीची क्षमता 50 टनांची आहे. मात्र, संपूर्ण राज्यभर कोरोनामुळे आणीबाणीची स्थिती असल्याने जळगाव जिल्ह्यासाठी दररोज केवळ 30 ते 35 टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. त्यामुळे, 8 ते 10 टन लिक्विड ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. जिल्ह्यातील परिस्थिती भविष्यात नियंत्रणात आली नाही तर रुग्णसंख्या अशाच प्रकारे वाढत जाऊन कृत्रिम ऑक्सिजनची गरज अजून भासेल, अशा वेळी अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यासाठी दररोज हवेत 2 टँकर
कोरोना संसर्गाची जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यासाठी दररोज दोन लिक्विड ऑक्सिजनचे टॅंकर मिळणे गरजेचे आहे. कृत्रिम ऑक्सिजनच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मुंबई व रायगड जिल्ह्यातील लिक्विड ऑक्सिजन उत्पादकांशी संपर्क साधला जात आहे. जिल्ह्यासाठी मुरबाड (कल्याण) तसेच तळोजा (रायगड) येथून लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे.