जळगाव -भाजपचे 'संकटमोचक' म्हणून ओळख असलेले राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन जामनेरमधून विधानसभा निवडणुकीत यंदा सहाव्यांदा आपले नशीब आजमावतील. त्यांच्या विरोधात विरोधी पक्षाकडे सध्या तरी सक्षम उमेदवार नाही. केवळ ही जागा बिनविरोध होऊ नये म्हणून लढण्याची वेळ विरोधकांवर आली आहे. यामुळे गिरीश महाजनांचे वाढते राजकीय वजन विरोधकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
जामनेर मतदारसंघाचा राजकीय इतिहास
सन १९९५ मध्ये तत्कालीन आमदार ईश्वरलाल जैन यांच्याविरुद्ध भाजपतर्फे नवख्या गिरीश महाजन यांना उमेदवारी देण्यात आली होती. कार्यकर्त्यांच्या जोरावर महाजन यांनी जैन यांचा धक्कादायक पराभव केला होता. २४ वर्षांपूर्वी मिळालेल्या विजयानंतर सलग ५ वेळा वाढत्या मताधिक्याने निवडणूक जिंकून राज्याच्या राजकारणात महाजन यांनी महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. १५ वर्षे विरोधात राहून ५ वर्षांपूर्वी आलेल्या भाजप सरकारमध्ये गिरीश महाजन यांना जलसंपदासारख्या मोठ्या खात्याचे मंत्रिपद मिळाले. कॅबिनेट मंत्रिपद मिळवल्यानंतर गिरीश महाजन यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर त्यांची यशस्वी राजकीय घोडदौड सुरूच आहे.
हेही वाचा... दत्तक घेतलेल्या 'धसवाडी' गावात 5 वर्षात एकदाही गेल्या नाहीत मंत्री पंकजा मुंडे... पाहा परिस्थिती
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला जामनेर विधानसभा मतदारसंघ १९९५ पासून भाजपच्या ताब्यात आहे. सलग ५ वेळा भाजपच्या तिकिटावर विजयी झालेल्या मंत्री महाजनांविरोधात सक्षम उमेदवार देण्याचे कडवे आव्हान यावेळी सर्वपक्षीय विरोधकांपुढे आहे. गिरीश महाजन यांनी बहुतांश विरोधकांना आपल्या तंबूत दाखल करून घेतले आहे. त्यामुळे सर्वपक्षीय विरोधकांकडे सक्षम उमेदवार नसल्याची स्थिती आहे.
अशी आहे जामनेरची राजकीय स्थिती ?
जामनेर मतदारसंघात शेती हा मूळ व्यवसाय आहे. गेल्या चार वर्षात राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना अपेक्षित न्याय न मिळाल्याची भावना बळावली आहे. योजना खूप जाहीर झाल्या; परंतु त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत निवडणुकीला सामोरे जाताना गिरीश महाजन यांना मतदारांना ठोस उत्तरे द्यावी लागणार आहेत. हा मुद्दा जर विरोधकांनी उचलून धरला तर त्यांच्या वाटेत अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाजन यांच्या विरोधात जुन्याच तलवारीने सामना ?
येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय गरुड यांचे त्यांना पुन्हा आव्हान राहण्याची शक्यता आहे. २००४ व २००९ च्या निवडणुकीत महाजन यांना काटें की टक्कर देणारे संजय गरुड हे पुन्हा एकदा आघाडीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत महाजनांना कडवे आव्हान देणारे डी. के. पाटील यावेळी राजकीय आखाड्यापासून दूर असल्याने त्यांच्या ऐवजी संजय गरुड हेच उमेदवार असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा... पवार साहेब! तुम्ही एकटे तरी किती लढणार...?
जातीय समीकरणे फोल ठरण्याची शक्यता
जामनेर तालुक्यात ६० हजारांच्या जवळपास मराठा समाजाची लोकसंख्या आहे. त्याखालोखाल बंजारा, माळी, मुस्लीम तसेच मागासवर्गीय समाजाची लोकसंख्या आहे. गिरीश महाजन हे गुर्जर समाजाचे आहेत. जामनेर तालुक्यात गुर्जर समाजाची लोकसंख्या केवळ ८ ते १० हजार इतकी आहे. तरीही गिरीश महाजन आपल्या कार्यकर्तृत्वाचा जोरावर सलग ५ वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे जामनेर विधानसभा मतदारसंघात जातीय समीकरणे फोल ठरल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहेत. या मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. बंजारा, माळी, मुस्लीम व अन्य समाज देखील बहुसंख्येने आहेत. मात्र, मतदारांशी असलेला थेट जनसंपर्क, भाजप कार्यकर्त्यांचे जाळे तसेच मंत्रिपदाचा प्रभाव ही गिरीश महाजन यांची जमेची बाजू राहिली आहे. सर्व समाजात महाजन यांनी आपली छाप पाडली आहे.