जळगाव - जिल्ह्यातील चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड मताधिक्य मिळाले होते; ते कायम राखण्याचा प्रयत्न भाजपचा असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र आपले आव्हान टिकवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे.
चाळीसगाव मतदारसंघाचा राजकीय इतिहास
चाळीसगाव हा राजकारण्यांचा तालुका म्हणून परिचित आहे. या तालुक्याने आतापर्यंत हरिभाऊ पाटसकर, सोनुसिंग पाटील व एम. के. पाटील यांच्या रूपाने केंद्रात मंत्रिपद मिळवले आहे. राजीव देशमुखांचा आमदारकीचा कार्यकाळ वगळता इथे भाजपचे वर्चस्व राहिलेले आहे. २००९ च्या निवडणुकीत मतदारसंघाची पुर्नरचना झाली. पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव देशमुख यांनी युतीचे उमेदवार वाडीलाल राठोड यांचा पराभव केला होता. २०१४ मध्ये भाजपचे उन्मेष पाटील विजयी झाले.
हेही वाचा... पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ : युती न झाल्यास तिरंगी लढाईची शक्यता
लोकसभा निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपने ए. टी. पाटील व आमदार स्मिता वाघ यांचे तिकीट कापून उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना पराभूत करत ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. लोकसभेच्या निकालाकडे पाहता विधानसभेसाठी ही निवडणूक राष्ट्रवादीला सोपी नाही. २०१४ विधानसभा निवडणुकीत चाळीसगावात ८ उमेदवार रिंगणात होते. भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी अशी लढत झाली. परंतु खरी लढत भाजपचे उन्मेष पाटील, राष्ट्रवादीचे राजीव देशमुख व अपक्ष रमेश उर्फ पप्पु गुंजाळ यांच्यातच झाली होती. त्यात उन्मेष पाटील २२ हजार मतांनी जिंकले होते.
चाळीसगाव मदारसंघात हे असू शकतात संभाव्य उमेदवार
या मतदारसंघातून राष्ट्रवादीला माजी आमदार राजीव देशमुखांशिवाय पर्याय नसल्याचे दिसत आहे. मात्र भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असून अंतर्गत गटबाजीही अधिक आहे. मंगेश चव्हाण, बेलगंगेचे चेअरमन चित्रसेन पाटील, सेना उपजिल्हाप्रमुख उमेश गुंजाळ, डॉ. प्रमोद सोनवणे, किशोर ढोमणेकरांची नावे चर्चेत आहेत. खा. उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा यांचेही छायाचित्र काही दिवसांपासून होर्डिंगवर झळकू लागले आहे. प्रफुल्ल साळुंखे हे देखील इच्छुक असून त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, ते कोणत्या पक्षाकडून रिंगणात उतरतात, हे निश्चित नाही.