जळगाव -जिल्ह्यातील भुसावळ शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले. भुसावळ शहरातील श्रीरामनगर भागातील एका 38 वर्षीय तरुणाचा चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी मंगळवारी (25 ऑगस्ट) रात्री मध्यरात्रीच्या सुमारास खून केला. मारेकऱ्यांनी सुरुवातीला तरुणावर चाकूने हल्ला केला, त्यानंतर गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. विलास चौधरी (वय 38 वर्षे, रा. श्रीराम नगर, भुसावळ), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मृत विलास चौधरी हा श्रीराम नगरातील रहिवासी आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी खून केला. विलास याच्यावर अचानकपणे चार ते पाच व्यक्तींनी चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर त्याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीही झाडली. त्यामुळे विलास गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला. या घटनेनंतर काही नागरिकांनी त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. परंतु, अति रक्तस्त्राव झाल्याने त्याचा उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाला.