जळगाव - जिल्ह्यात कोरोना विषाणूचे अक्षरश: थैमान सुरू आहे. दिवसागणिक कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा वाढतच असून, परिस्थिती आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. एका बाजूला कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असताना, दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही समाधानकारक असल्याने काहीसा दिलासा आहे. शनिवारी दिवसभरात ७५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
जिल्हा प्रशासनाला शनिवारी सायंकाळी जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या संशयित व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून त्यात ७५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये यावल १७, चोपडा १६, जळगाव ग्रामीण ०७ तसेच जळगाव शहर, धरणगाव, पारोळा प्रत्येकी ०६, रावेर ०५, अमळनेर ०४, भडगाव ०३, भुसावळ ०२, एरंडोल, जामनेर, मुक्ताईनगर प्रत्येक ०१ रुग्णांचा रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ हजार ६५३ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.