जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आता अतिशय वेगाने फैलावत आहे. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात 115 जणांची कोरोना पॉझिटिव्ह म्हणून भर पडली. तर, यातील पॉझिटिव्ह म्हणून समोर आलेल्यांमध्ये चौघांचे कोरोना चाचणी अहवाल मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे भुसावळ आणि रावेर येथील दोघांचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यात भुसावळच्या 79 वर्षीय वृद्धाला हृदयरोग तर रावेरच्या 55 वर्षीय महिलेला थायरॉईडचा त्रास होता.
यामध्ये, भुसावळातील 79 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने 27 मे रोजी कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या वृद्धाचा बुधवारी सकाळी 5 वाजता मृत्यू झाला. त्याचप्रमाणे, रावेरच्या 55 वर्षीय महिलेला 2 जूनला कोव्हीड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचाही बुधवारी पहाटे साडेचार वाजता मृत्यू झाला.
तर, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला बुधवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालात यावल येथील दोघे तसेच जळगाव व भडगावच्या प्रत्येकी एकाचा कोरोना अहवाल मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आला आहे. यावल येथील एका 44 वर्षीय व्यक्तीला 4 जूनला कोव्हीड रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा 5 जूनला मृत्यू झाला. तसेच एका 38 वर्षीय व्यक्तीला 6 जूनला कोव्हीड रुग्णालयात दाखल केले होते. त्याचाही 7 जूनला मृत्यू झाला आहे. तर, जळगावातील 56 वर्षीय महिलेला 5 जूनला दाखल करण्यात आले होते, तिचाही 6 जूनला मृत्यू झाला आहे. भडगाव येथील 45 वर्षीय व्यक्तीला 6 जूनला दाखल केले होते. त्याचा त्याच दिवशी मृत्यू झाला.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील 120 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यात 116 जणांचा कोव्हीड रुग्णालयात तर पाचोरा, अमळनेर, चाळीसगाव, चोपडा येथील प्रत्येकी एकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. समाधानाची बाब म्हणजे, बुधवारी 21 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 601 जण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. तर, 675 जणांवर उपचार सुरू असून त्यातील 42 जण अत्यवस्थ आहेत.