जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. रविवारी यात पुन्हा ३०४ रुग्णांची भर पडल्याने आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७ हजार ७९६ इतकी झाली आहे. जिल्ह्यात एकाच दिवशी तीनशेहून अधिक नवे रुग्ण आढळून येण्याची ही दुसरी वेळ आहे. तर, जिल्ह्यातील प्रमुख हॉटस्पॉट असलेल्या जळगाव शहरात तब्बल १०७ रुग्ण आढळून आले असून १७४ जणांना उपचाराअंती बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. दररोज शेकडोंच्या संख्येने नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. रविवारी पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येने तीनशेचा आकडा पार केला. जळगाव शहरातील १०७ सह जिल्ह्यात ३०४ रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, रविवारी दिवसभरात पुन्हा १० रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला, तर १७४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
जळगावात शंभरी -
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता असल्याने दररोज पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडादेखील मोठा येत आहे. यात जळगाव शहराची स्थिती अधिक बिकट बनली आहे. जिल्ह्यात रोज आढळून येणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये निम्मे आकडे हे जळगाव शहरातील आहेत. अनेक दिवसांपासून जळगाव शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा नव्वदीच्या वर येत होता. रविवारी मात्र, जळगाव शहरातदेखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा शंभरच्या वर गेला असून दिवसभरात १०४ रुग्ण शहरात आढळून आले आहेत.