जळगाव -केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल तसेच डिझेलचे दर वाढवले आहेत. त्यामुळे महागाई भडकली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. शनिवारी दुपारी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चुलीवर स्वयंपाक करत महागाईचा निषेध नोंदवला.
चुलीवर स्वयंपाक करत महागाईचा निषेध; मुक्ताईनगरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन - रस्त्यावर चूल पेटवून गॅस दरवाढीचा निषेध
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेचच घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढले. पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने वाढतच चालले आहेत. पेट्रोल शंभरीच्या तर डिझेल नव्वदीच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे, अशा भावना याप्रसंगी आंदोलकांनी व्यक्त केल्या.
मुक्ताईनगरातील मुख्य चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर, युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील यांच्यासह राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. केंद्र सरकारने वाढती महागाई त्वरित नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल व डिझेलचे दर नियंत्रणात आणावेत, अशा प्रकारच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
चुलीवर स्वयंपाक करण्याची आली वेळ- अॅड. रोहिणी खडसे
याप्रसंगी प्रतिक्रिया देताना ऍड. रोहिणी खडसे म्हणाल्या की, केंद्र सरकार वाढती महागाई नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढवल्यामुळे आता महिलांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारच्या सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याच्या घोषणा हवेत विरल्या आहेत, अशी टीका ऍड. रोहिणी खडसे यांनी केली.