जळगाव -जिल्हा बॅंक निवडणुकीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला असून, आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. छाननी प्रक्रियेत भाजपच्या दिग्गज उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवल्याचा आरोप भाजपने केला. त्यावर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया देत भाजपचे आरोप खोडून काढले आहेत.
हेही वाचा -जळगावात गुन्हेगारीचे उदात्तीकरण! जामिनावर सुटलेल्या आरोपीचे जंगी स्वागत करत काढली मिरवणूक
डॉ. सतीश पाटलांनी केले गंभीर आरोप
भाजपने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडण्यात आली. त्यात माजी मंत्री डॉ. सतीश पाटलांनी गंभीर आरोप केले. भाजपच्या खासदार रक्षा खडसे व माजी आमदार स्मिता वाघ यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांना जाणीवपूर्वक फसवले आहे. त्यामुळे, गिरीश महाजन यांनी आरोप करण्यापेक्षा स्वतः आत्मपरीक्षण करावे. खासदार रक्षा खडसे यांना पुढे पक्षातून तिकीट घ्यायचे असेल म्हणून गिरीश महाजन यांच्या आदेशाने त्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, त्यांची जिल्हा बँकेत उभे राहण्याची हिंमत झाली नाही, म्हणूनच जाणीवपूर्वक उमेदवारी अर्ज अपूर्ण ठेवला, असा आरोपही डॉ. सतीश पाटील यांनी केला. माजी आमदार स्मिता वाघ यांनाही निवडणूक प्रक्रियेचा अनुभव आहे. असे असताना त्यांनी आपला अर्ज अपूर्ण ठेवणे संशयास्पद असल्याचेही डॉ. पाटील म्हणाले.