महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात राष्ट्रवादी-शिवसेना आमनेसामने; शहरातील खराब रस्त्यांच्या मुद्द्यावरून महापालिकेविरोधात आंदोलन

जळगाव शहरातील खराब रस्त्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीने आक्रमक झाली. सोमवारी महापालिकेविरोधात राष्ट्रवादीने आंदोलन केले.

ncp agitation
राष्ट्रवादीचे आंदोलन

By

Published : Aug 30, 2021, 5:02 PM IST

Updated : Aug 30, 2021, 6:23 PM IST

जळगाव -शहरातील खराब रस्त्यांच्या प्रश्नावर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होत, महापालिका प्रशासन व सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात दंड थोपटले. रस्त्यांचा प्रश्न मार्गी न लागत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आंदोलन करत महापालिका बरखास्त करण्याची मागणी केली. या आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडून शिवसेनेला घरचा आहेर दिल्याची चर्चा रंगली आहे. राज्याच्या सत्तेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेची कोंडी केली आहे.

अभिषेक पाटील - महानगराध्यक्ष, राष्ट्रवादी

हेही वाचा -पोलिसांसमोर अनुपस्थितीसाठी वकिलांनी दिले प्रकृती अस्वास्थ्याचे कारण; अन् राणे विमानातून दिल्लीला रवाना!

राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगरप्रमुख अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. महापालिकेसमोर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. आयुक्त व महापौरांच्या राजीनाम्याची मागणी देखील यावेळी राष्ट्रवादीकडून करण्यात आली. रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा खुर्ची खाली करा, असे सांगत शिवसेना विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

  • महापौर व आयुक्तांनी घेतली आंदोलकांची भेट-

महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत, महापौर व आयुक्तांनी खाली येवून निवेदन स्वीकारण्याची मागणी केली. मात्र, अर्धातास महापौर व आयुक्तांनी आंदोलकांची भेट न घेतल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले. त्यानंतर महापौर जयश्री महाजन व आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेवून कार्यवाहीचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

  • ...अन्यथा महापालिकेला टाळे ठोकणार-

आंदोलनाबाबत भूमिका मांडताना राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस राज्याच्या सत्तेत शिवसेनेसोबत आहे. मात्र, राज्याचा विषय वेगळे आणि स्थानिक पातळीवरचे विषय वेगळे असतात. आम्ही लोकांचे प्रश्न सुटत नसतील तर रस्त्यावर उतरू. आम्ही शिवसेनेला सत्तेत आल्यानंतर ६ महिन्यांचा अल्टीमेटम दिला होता. मात्र, ६ महिन्यात शिवसेनेने एकही काम न केल्यानेच त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. शहरातील रस्त्यांचा प्रश्न लवकर मार्गी लावला नाही तर आम्ही महापालिकेला टाळे ठोकू, असा इशारा महानगरप्रमुख अभिषेक पाटील यांनी दिला.

हेही वाचा -राज्यात रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील - राजेश टोपे

Last Updated : Aug 30, 2021, 6:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details