महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव: राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हा पुरवठा विभागातर्फे वेबिनार; जिल्हाधिकारी राऊत यांचे मार्गदर्शन - jalgaon latest news

अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय पुरवठा शाखेमार्फत आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

jalgaon
jalgaon

By

Published : Dec 24, 2020, 8:50 PM IST

जळगाव -ऑनलाईन खरेदीच्या जमान्यात ग्राहकांनी वस्तुची किंमत, दर्जा, उपयोगिता आदिंबाबत सजग राहूनच वस्तुची खरेदी करावी. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय पुरवठा शाखेमार्फत आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना राऊत बोलत होते. यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या. संजय बोरवाल, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, पोलीस उप अधीक्षक अरुण धनावडे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त य. को. बेंडकुळे, वैधमापन शास्त्र विभागाचे सहायक आयुक्त बी. जी. जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या वेबिनारमध्ये जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी ऑनलाइन सहभागी झाले होते. याशिवाय या कार्यक्रमाचे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेसबुक पेजवरुन लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आले.

आर्थिक व्यवहार करताना ग्राहकांनी काळजी घ्यावी-

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांनी ऑनलाईन वस्तुंची विक्री करणाऱ्या संस्थांबाबत अधिक दक्ष राहणे आवश्यक आहे. आपणास आवश्यक असलेल्या वस्तुबाबत परिपूर्ण माहिती करुन घेतल्याशिवाय वस्तुची खरेदी करु नये. विशेषत: आर्थिक व्यवहार करतांना ग्राहकांनी खुप काळजी घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन खरेदीत आपल्या एटीएमचा पीन गोपनीय राहील, ओटीपी कोणालाही देवू नये, रक्कमेची नोंद करतांना काळजी घ्यावी, अनावश्यक ॲप डाऊनलोड करु नये, लॉटरी लागल्याचा इमेल प्राप्त झाला असल्यास त्याबाबत खात्री करावी. जेणेकरुन स्वत:ची व इतरांचीही फसवणूक आपण टाळू शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नवीन कायदा हा ग्राहकांना वरदान-

न्या. बोरवाल म्हणाले, ग्राहकांच्या संरक्षणासाठी 1986 मध्ये केलेल्या कायद्यात 2019 मध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. नवीन कायदा हा ग्राहकांना वरदान ठरणार असून ग्राहकांचे सहा हक्क आहेत त्याची माहिती ग्राहकांनी करुन घेणे आवश्यक आहे. ग्राहकाने वस्तुची खरेदी करतांना जागरुक राहून त्याचे बील घेणे आवश्यक आहे. ग्राहक आयोगाची जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशी त्रिस्तरीय रचना असून जिल्हा आयोगाकडे एक कोटी रुपयांपर्यंतचे दावे चालविण्यात येतात. बि-बियाणेविषयी तक्रारी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्व तपशील जपून ठेवणे आवश्यक आहे. 5 लाख रुपये किंमतीच्या वस्तुबाबत तक्रार करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही असे सांगून आयोगाकडे तक्रार कशी करावी? याविषयीची माहिती जाणून घेतली पाहिजे. फसव्या जाहिरातींविरोधात सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॅरिटीकडे (सीसीपीए) दाद मागता येते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कायद्यांची दिली माहिती-

बेंडकुळे यांनी अन्न पदार्थांविषयीच्या तर डॉ माणिकराव यांनी औषधांविषयीच्या कायद्यांची माहिती दिली तसेच अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे वेळोवेळी करण्यात आलेल्या तपासणी मोहीमची व दोषींविरुध्द केलेल्या दंडात्मक कारवाईची माहिती दिली. जाधव यांनी वैधमापन शास्त्र विभागामार्फत अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या ग्राहक हिताच्या कायद्यांची माहिती दिली.

नागरिकांनी ग्राहक संरक्षण कायद्याचा वापर करावा-

जिल्हा पुरवठा अधिकारी अधिकारी सुर्यवंशी यांनी ग्राहकाला माहिती मिळविण्याचा, सुरक्षिततेचा व वस्तु निवडण्याचा हक्क असल्याचे सांगून नागरिकांनी ग्राहक संरक्षण कायद्याचा पुरेपूर वापर करण्याचे आवाहन केले. सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात राष्ट्रीय ग्राहक दिनाची माहिती दिली. उपस्थितांचे आभार ए. जी. जोशी यांनी मानले.

ABOUT THE AUTHOR

...view details