महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पार्किंगच्या वादातून तरुणाचा खून ; जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयातील घटना

By

Published : Jun 29, 2019, 4:49 PM IST

Updated : Jun 29, 2019, 6:17 PM IST

मृत मुकेश सपकाळे

2019-06-29 15:49:39

जळगाव - शहरात पार्कींगच्या वादातून काही तरूणांनी चॉपरने वार करत एका तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास शहरातील मूळजी जेठा महाविद्यालयात घडली. मुकेश उर्फ बंटी मधुकर सपकाळे (वय 23, रा. असोदा, ता. जळगाव) असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

मुकेश सपकाळे हा मूळजी जेठा महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी त्याचा भाऊ रोहीतसोबत दुचाकीवरून आला होता. महाविद्यालयाच्या दुचाकी पार्किंगमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या दुचाकीचा धक्का पार्किंगमध्ये उभे असलेल्या तीन तरुणांना लागला. याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला. तिघांनी मुकेशसह त्याच्या भावाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. नंतर तिघांनी मुकेश आणि रोहीत यांना मारण्यासाठी २० ते २५ गुंड बोलावले. त्या सर्वांनी दोन्ही भावांना बेदम मारहाण केली. 

त्याच दरम्यान मुकेशचे देखील मित्र तेथे पोहोचले. परंतु, हाणामारीत टोळीतील एकाने मुकेशच्या गळ्यावर, छातीवर चॉपरने वार केले. मुकेश जमिनीवर पडताच टोळीतील तरुण पळून गेले. चॉपरने वार झाल्यामुळे मुकेश गंभीर जखमी झाला. त्याला रोहीत आणि त्याच्या मित्रांनी लगेचच उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुकेशला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती होताच पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी पोलीस पथकासह घटनास्थळ गाठले. त्यानंतर मुकेशच्या कुटुंबियांसह मित्रांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतल्यावर हृदय हेलावणारा आक्रोश केला. कुटूंबियांनी मारेकऱ्यांना अटक केल्याशिवाय मुकेशचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. 

मात्र, पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती देत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, सपकाळे कुटुंबीय ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने जिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांनी महाविद्यालयाच्या पार्किंगमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. परंतु, हाती ठोस काही लागले नाही. एका कॅमेऱ्यात घटनेचे चित्रण झाले आहे, ते पोलिसांनी तपास कामासाठी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास रामानंदनगर पोलीस करत आहेत.

Last Updated : Jun 29, 2019, 6:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details