जळगाव - शहरातील मनसेचे माजी पदाधिकारी घन:श्याम शांताराम दीक्षित यांच्या खुनाचा उलगडा पोलिसांनी अवघ्या पाच तासात केला आहे. उसनवार दिलेल्या पैशांच्या कारणावरून झालेला वाद टोकाला गेल्याने संशयित आरोपी सनी उर्फ चालीस वसंत पाटील व मोहिनीराज उर्फ मुन्ना अशोक कोळी या दोघांनी हा खून केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती आज सोमवारी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मनसे पदाधिकाऱ्याचा खून पैशांच्या वादातूनच; पोलीस अधीक्षकांचे स्पष्टीकरण
मनसेचे माजी पदाधिकारी घन:श्याम शांताराम दीक्षित यांच्या खुनाचा उलगडा झाला आहे. दरम्यान, उसनवार दिलेल्या पैशांच्या कारणावरून झालेला वाद टोकाला गेल्याने संशयित आरोपी सनी उर्फ चालीस वसंत पाटील आणि मोहिनीराज उर्फ मुन्ना अशोक कोळी या दोघांनी हा खून केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
खुनाची घटना समोर आल्यानंतर औद्योगिक वसाहत पोलिसांनी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लागेच तपास चक्रे फिरवली. परिस्थितीजन्य पुराव्यांवरून घटनेचा पाच तासातच उलगडा करत सनी पाटील व मुन्ना कोळी यांना अटक केली. या दोन्ही संशयितांविरुद्ध यापूर्वी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सनी पाटील याच्यावर यापूर्वीही खुनाचा गुन्हा दाखल असून तो सध्या जामिनावर बाहेर होता. असे पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांनी सांगितले. या घटनेमागे अन्य दुसरे कोणतेही कारण नसून उसनवारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून घन:श्याम दीक्षित यांचा खून झाला. असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, हा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक करणाऱ्या पोलीस पथकाचे त्यांनी अभिनंदन करत बक्षीस जाहीर केले.
पत्रकार परिषद घेऊन सारवासारव -
जळगाव जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून चोऱ्या, घरफोड्या, हाणामाऱ्या आणि खून यासारख्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे माध्यमांनी पोलीस प्रशासनाला लक्ष करत त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांनी पत्रकार परिषदेत सारवासारव केली. घन:श्याम दीक्षित यांच्या खुनाचा उलगडा पोलिसांनी पाच तासात केला. तसेच दोन चोरट्यांना चोरी तसेच घरफोड्यांच्या गुन्ह्यात अटक केली असून त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येणार असल्याचे सांगितले. ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत मात्र, त्यांनी सावध उत्तरे देत वेळ मारून नेली.