जळगाव -गुन्हेगारीच्या घटनांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे भुसावळ शहर पुन्हा एका खुनाच्या घटनेने हादरले आहे. शहरातील जामनेर रस्त्यावरील श्रद्धा कॉलनीत असलेल्या गजानन महाराज मंदिराजवळ गुरुवारी रात्री एका अज्ञात तरुणाचा निर्घृणपणे खून झाला आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना उजेडात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. मारेकऱ्यांनी तरुणाच्या अंगावर आधी चाकूने वार केले आहेत. त्यानंतर मृत तरुणाची ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा दगडाने ठेचून विद्रुप केला आहे.
अशी समोर आली घटना
श्रद्धा कॉलनीतील गजानन महाराज मंदिरात शुक्रवारी सकाळी काही नागरिक दररोजप्रमाणे दर्शनासाठी आले. त्यावेळी अज्ञात तरुण रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेला असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. मृतदेहाची स्थिती पाहून हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट होत असल्याने, या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
चेहरा ठेचल्याने ओळख पटवण्यात अडचणी
खून झालेल्या तरुण हा 32 ते 35 वयोगटातील आहे. मारेकऱ्यांनी त्याच्या अंगावर चाकूने वार केलेले असून, चेहरा दगडाने ठेचून विद्रुप केला आहे. त्यामुळे मृत तरुणाची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिसरातील नागरिकांचे जबाब नोंदवून घेतले. मृत तरुणाची ओळख व्हावी म्हणून त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. यासंदर्भात कुणाला काही माहिती असेल तर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.