महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डांगर येथील अल्पवयीन मुलाच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण; वर्षभरानंतर खुनाचा गुन्हा दाखल

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील डांगर बुद्रुक येथील एका 10 वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या मृत्यू प्रकरणाला वर्षभरानंतर वेगळे वळण लागले आहे. आपल्या मुलाचा नरबळी देण्यात आल्याचा आरोप करत मृताच्या पालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशावरुन 16 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Amalner Police station
अमळनेर पोलीस ठाणे

By

Published : Mar 10, 2021, 8:54 PM IST

जळगाव-जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील डांगर बुद्रुक येथील एका 10 वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या मृत्यू प्रकरणाला वर्षभरानंतर वेगळे वळण लागले आहे. अंधश्रद्धेपोटी आपल्या मुलाचा नरबळी देण्यात आल्याचा आरोप करत मृत मुलाच्या पालकांनी न्यायालयात तक्रार केली होती. न्यायालयाने या तक्रारीची गंभीर दखल घेत 16 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

काय आहे प्रकरण..?

डांगर बुद्रुक गावातील सुभाष बसराज राठोड (वय 39 वर्षे) यांचा मुलगा सुदर्शन सुभाष राठोड (वय 10 वर्षे) याचा 7 एप्रिल, 2020 रोजी गावाच्या शेतशिवारातील धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकरणी तेव्हा अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली होती. मात्र, आपल्या मुलाचा मृत्यू पाण्यात बुडून झाला नसून त्याचा नरबळी दिल्याचा आरोप राठोड कुटुंबियांनी केला होता. याबाबत त्यांनी न्यायालयाकडे तक्रार केली होती.

काय म्हटले होते तक्रारीत..?

डांगर बुद्रुक येथील इंदल हिरामण चव्हाण यांचा मुलगा झिंग्या हा नेहमी आजारी राहत होता. त्यामुळे मुलगा बरा व्हावा म्हणून इंदल याने जादू जादूटोण्यावर विश्वास ठेऊन शेतात चावदसनिमित्त 7 एप्रिल, 2020ला डाळ बट्टीच्या जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. या जेवणासाठी त्यांनी गावातील सुभाष राठोड यांचा मुलगा सुदर्शन राठोड याला निमंत्रण दिले होते. त्यानंतर त्याला बोलावून घेण्यासाठी झिंग्याला पाठवले होते. तो सुदर्शन याला घरून बोलावून शेतात घेऊन गेला. त्यानंतर सुदर्शन याच्या कपाळावर टिळा लावून गळ्यात मिरची, लिंबू घालून सुदर्शन रोहिदास चव्हाण यांच्या शेताजवळील धरणात घेऊन गेले. त्याला धरणात बुडवून मारले, असा आरोप सुभाष राठोड यांनी न्यायालयाकडे केलेल्या तक्रारीत केला होता. या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

यांच्यावर दाखल झाला गुन्हा

या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून रोहिदास हिरामण चव्हाण, मनीराम हिरामण चव्हाण, इंदल हिरामण चव्हाण, योगेश मनीराम चव्हाण, रामसिंग नंदा चव्हाण, दादू रोहिदास चव्हाण, नीलेश रोहिदास चव्हाण, सोनी रोहिदास चव्हाण, निकिता इंदल चव्हाण, चंद्रकला मनीराम चव्हाण, तुळसाबाई रोहिदास चव्हाण, भारती इंदल चव्हाण, ताई रामसिंग चव्हाण, शंकर रामसिंग चव्हाण, नवसाबाई हिरामन चव्हाण (सर्व रा. डांगरी) आणि ज्ञानेश्वर चव्हाण (रा. रणाईचे) यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा सखोल तपास केला जात असल्याने अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

हेही वाचा -जळगावात कोविड सेंटरमध्ये रुग्णाने आणल्या मद्याच्या बाटल्या, गुटख्याच्या पुड्या

हेही वाचा -जळगावात सोनसाखळी चोरणारी टोळी गजाआड; 18 गुन्हे उघडकीस

ABOUT THE AUTHOR

...view details