महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप सोडणार नाही- रक्षा खडसे, जाणून घ्या या मागे काय असेल कारण...

एकनाथ खडसे यांनी आज भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी दुपारी त्यांचा मुंबईत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश सोहळा होणार आहे.

mp raksha khadse
खासदार रक्षा खडसे

By

Published : Oct 21, 2020, 5:04 PM IST

Updated : Oct 21, 2020, 5:54 PM IST

जळगाव -आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत दुःखदायक आहे. नाथाभाऊंच्या निर्णयाचे आम्हाला दुःख आहे. पण, मी भाजपकडून निवडून आले आहे, मी भाजप सोडणार नाही. भाजपतच मी काम करत राहणार आहे, अशी प्रतिक्रिया खासदार रक्षा खडसे यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यावर दिली आहे. रक्षा खडसे या एकनाथ खडसे यांच्या सून आहेत.

हेही वाचा -BREAKING : एकनाथ खडसेंचा भाजपाला 'जय श्रीराम'; शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश

एकनाथ खडसे यांनी आज भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी दुपारी त्यांचा मुंबईत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश सोहळा होणार आहे. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार रक्षा खडसे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्तीगत कारणामुळे भाजपचा राजीनामा दिला आहे. आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत दुखदायक आहे. नाथाभाऊंच्या निर्णयाचे आम्हाला पक्ष म्हणून दुःख आहे. पक्ष सोडण्याच्या बाबत रक्षा खडसे म्हणाल्या की, मी भाजपकडून निवडून आले आहे. भाजपचा उमेदवार म्हणून लोकांनी मला निवडून दिले आहे. मी भाजपतच राहणार असून पक्षाचे काम करत राहणार आहे. पक्ष जो काही जबाबदारी देईल; ती मी पूर्ण करणार आहे, असे सांगत आपण पक्ष सोडणार नसल्याचे रक्षा खडसे यांनी स्पष्ट केले.

भाजपने त्यांना भरपूर काही दिले आहे, हे त्यांनीसुद्धा नमूद केले आहे. सर्वजण पक्षामुळेच मोठे होत असतात. पण नाथाभाऊंचेही योगदान पक्षवाढीसाठी होते, हे नाकारता येत नाही. त्यांनी 40 वर्षे पक्षासाठी दिली आहेत. त्यांच्यामुळे राज्यात पक्ष मोठा झाला, हे मान्यच करावे लागेल. मी सांगितले तसेच झाले पाहिजे, असा आग्रह नाथाभाऊंचा कधी नव्हता. त्यांनी माझ्यावर कधीही दबाव टाकला नाही. त्यांनी राजीनामा दिला म्हणजे मीही राजीनामा दिला पाहिजे, असे काही नाही, असेही रक्षा खडसेंनी नमूद केले.

रक्षा खडसे का म्हणाल्या, की भाजप सोडणार नाही

रक्षा खडसे रावेर मतदारसंघातून खासदार आहेत. भाजपच्या तिकीटावर त्या निवडणून आल्या आहेत. एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्यावर रक्षा खडसे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. पण त्यांनी भाजप सोडणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. सध्या एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांच्याकडे त्यांचा राजकीय वारस म्हणून बघितले जात आहे. खडसे यांनीही त्यांना वारस म्हणून अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे. रक्षा खडसे यांनी आता राजीनामा दिला तर रावेरचे जागी रिकामी होईल. निवडणूका लागतील. त्यात रक्षा खडसे निवडून येतील की नाही याची सध्या खडसे यांना शाश्वती नसल्याचे समजते. त्यामुळेच रक्षा खडसे यांना भाजपमध्ये ठेवून. जेव्हा लोकसभेच्या निवडणुका लागतील तेव्हा ती जागा राष्ट्रवादीकडे खेचण्याचे खडसे यांचे नियोजन असावे, असे सांगितले जात आहे.

Last Updated : Oct 21, 2020, 5:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details