जळगाव - जिल्हा कारागृहात कैद्यांची झडती घेतली असता, बराक क्रमांक सहामध्ये इलेक्ट्रिक बोर्डामागे एक मोबाईल आढळून आला. या घटनेमुळे पुन्हा एकदा कारागृहाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, कारागृहातील कैद्यांना मोबाइल, त्याचप्रमाणे नशेचे साहित्य पुरवण्यात कारागृहातील काही कर्मचाऱ्यांचे लागेबांधे असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
२५ जुलै रोजी कारागृह रक्षकाच्या डोक्याला पिस्तुल लावून सुशील मगरे, गौरव पाटील व सागर पाटील या तीन कैद्यांनी पलायन केले. या तिघांनी कारागृहात मोबाईल, पिस्तुलचा वापर केल्याचे तपासात उघड झाले आहे. यानंतर काही दिवसातच कारागृहाच्या भिंतीवरून आतमध्ये विडी बंडल, कपडे, साबण आत फेकताना दोन जणांना पोलिसांनी रंगेहात अटक केली. पलायन केलेले कैदी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. हे दोन्ही प्रकरण ताजे असताना मंगळवारी कारागृह अधीक्षक जोसेफ गायकवाड यांनी अचानकपणे कैद्यांची झडती घेतली. यावेळी बराक क्रमांक सहामध्ये इलेक्ट्रिक बोर्डाच्या मागे एक मोबाईल आढळून आला. हा मोबाईल कोणाचा आहे?, कारागृहात कसा आला?, कोण वापर करत होते? याबाबत कैद्यांना विचारणा केली असता कोणीही समाधानकारक उत्तर दिले नाही.