जळगाव - जिल्ह्यातील यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या झाली आहे. ही घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. कैलास चंद्रकांत सपकाळे (वय १६, रा. डांभुर्णी) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे.
जळगावात अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या - jalgaon crime news
डांभुर्णी येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या झाली आहे. ही घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. क्रूरतेचा कळस म्हणजे मारेकऱ्यांनी मुलाच्या दोन्ही डोळ्यांमध्ये काड्या खुपसल्या आहेत तर डोक्यात विटांचा मारा केला आहे.
कैलास सपकाळे हा 2 एप्रिल रोजी गावातून अचानक बेपत्ता झाला होता. त्यानंतर आज दुपारी साडेतीनच्या सुमारास त्याचा मृतदेह डांभुर्णी शिवारातील दीपक पाटील यांच्या शेतात आढळून आला. ही घटना समोर आल्यानंतर डांभुर्णी गावात एकच खळबळ उडाली. मारेकऱ्यांनी कैलासच्या दोन्ही डोळ्यांमध्ये काड्या खुपसल्या आहेत तर डोक्यात विटांचा मारा केला आहे. घटनास्थळी असलेल्या परिस्थितीवरून कैलासची निर्घृण हत्या केल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्याची हत्या का झाली? याचे कारण समोर आलेले नाही.
घटनास्थळी यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर कैलासचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.