जळगाव - 'प्रत्येकाने आपल्या आयुष्याकडे एक स्पर्धा म्हणूनच पाहायला हवं. आज हरलो काही फरक पडत नाही, उद्या मी नक्की जिंकणार. ही जिद्द अंगी ठेवा', असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
शहरातील मूळजी जेठा महाविद्यालयातील एकलव्य क्रीडा संकुलाच्या मैदानावर जलसंपदा विभागाच्या कला, क्रीडा तसेच सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता या स्पर्धांचे उदघाटन गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थितांसह स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, नोकरी करत असताना आपल्याला ताणतणाव, अडचणींना सामोरे जावे लागते. याच ताणतणावातून बाहेर पडता यावं, आपल्यातील कलागुणांना वाव मिळावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून तो कौतुकास्पद आहे. स्पर्धेत कुणाला यश मिळेल तर कुणाला अपयश येईल. मात्र, त्यातून निराश न होता प्रत्येकाने आज हरलो, उद्या नक्की जिंकणार, ही जिद्द अंगी ठेवायला हवी. मी देखील एक निवडणूक हरलो होतो. पण नंतर 5 वर्षे मेहनत केली. त्यानंतर मला ज्या पदाची अपेक्षा होती, त्याच पदावर येऊन बसलो, असेही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.