जळगाव- राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे आज (शुक्रवार) दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यावर असताना अमळनेर तालुक्यातील आनोरे या गावात शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर हाती टाळ घेत ते भजनात रमले. खुद्द मंत्री आपल्यात येऊन भजनात साथसंगत करत असल्याचे पाहून उपस्थित ग्रामस्थही भारावले.
आनोरे गावात आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सुरुवातीला शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. दुष्काळसंदर्भात राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी 'आमच्या गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला असून आम्ही श्रमदानावर आधारित काही भजने रचली आहेत. त्यातील काही भजने मंत्री महोदयांनी ऐकावी', अशी गळ घातली. ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन चंद्रकांत पाटील भजने ऐकण्यासाठी व्यासपीठाच्या खाली येऊन बसले. भजने ऐकत असताना हाती टाळ घेण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. टाळ वाजवत त्यांनी भजनाला साथसंगत केली.