जळगाव - संगीत क्षेत्रात अलीकडच्या काळात मोठा बदल झाला असून, तो चांगला आहे. संगीताचे जागतिकीकरण झाले आहे. मराठी, हिंदीतील संगीत आता बॉलिवूडच नव्हे तर, हॉलिवूडमध्येही आहे. मराठी संगीतकारांनी आपली संस्कृती जपून ठेवली आहे. मराठी संगीतकार जागतिक संगीत आणि संस्कृतीचे योग्य मिश्रण करतात. अशा कंपोजेसमुळे संस्कृती तर टिकून राहीलच, शिवाय आपल्याला ग्लोबल प्लॅटफॉर्म मिळेल, असे मत प्रसिद्ध मराठी गायक स्वप्निल बांदोडकर यांनी व्यक्त केले.
बोलताना गायक स्वप्निल बांदोडकर हेही वाचा -जळगाव तालुक्यामध्ये १५ अन् १७ फेब्रुवारीला सरपंच, उपसरपंच निवड
खान्देशात चित्रित झालेला 'एक ती' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गायक स्वप्निल बांदोडकर, मराठी चित्रपट अभिनेत्री प्रेमा किरण यांच्यासह चित्रपटाची टीम जळगावात आलेली होती. यावेळी स्वप्निल बांदोडकर हे पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी चित्रपटाचे निर्माता सचिन अवसरमल, मुख्य नायक तुषार बैसाणे, संगीत दिग्दर्शक तेजस चव्हाण उपस्थित होते.
'एक ती' चित्रपट नवी उमेद, आशा घेऊन येत आहे
स्वप्निल बांदोडकर पुढे म्हणाले, 'एक ती' हा चित्रपट नवी उमेद, नवी आशा घेऊन येत आहे. कोरोनामुळे खूप कमी निर्माते चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस करत आहेत. अशा परिस्थितीत सचिन अवसरमल हे धाडस करत आहेत. विपरित परिस्थितीत जो पहिले पाऊल उचलतो, त्याचे आपण कौतुक करायला हवे, असेही बांदोडकर म्हणाले.
ग्रामीण भागातील कलाकारांना प्रोत्साहन देण्याची गरज
यावेळी अभिनेत्री प्रेमा किरण म्हणाल्या की, ग्रामीण भागात चांगले कलाकार आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील कलाकारांना प्रोत्साहन मिळाले तर ते मोठ्या पडद्यावर आपल्या कलेचा ठसा उमटवू शकतात. ग्रामीण बोलीभाषेत गोडवा आहे. ती ऐकायला आणि बोलायला खूप सुंदर वाटते. म्हणूनच ग्रामीण बोलीभाषा मनाला भावते, असेही अभिनेत्री प्रेमा किरण म्हणाल्या. प्रमाणभाषा ही शुद्ध असते. त्यामुळे ती नाटकी वाटते, असे सांगत किरण यांनी यापुढे बोलीभाषेतील चित्रपटांमध्ये काम करायची आपली इच्छा असल्याची भावना बोलून दाखवली.
हेही वाचा -जळगाव : नेहरू युवा केंद्रातर्फे 'एचआयव्ही एड्स' विषयी जनजागृती