जळगाव -माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी भाजपाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच भाजपा सोडल्याचे ते म्हणाले. माझ्या राजकीय जीवनात मी 40 वर्षं भाजपाच्या वाढीसाठी खर्ची घातली. पक्षानेही मला खूप काही दिले. परंतु, गेल्या साडेचार वर्षांपासून मला देवेंद्र फडणवीस यांनी छळले. माझ्यावर अन्याय केला. अन्यायाबाबत मी पक्षाकडे वेळोवेळी माझी भूमिका मांडली. पण मला न्याय मिळाला नाही. शेवटी मी समर्थकांशी निर्णय घेऊन भाजपाची साथ सोडली, असे आज एकनाथ खडसे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीत पदाची अपेक्षा नाही
मी कोणत्याही पदाच्या अपेक्षेने राष्ट्रवादीत जात नाहीये. मला जिल्ह्यासह राज्याच्या विकासासाठी राष्ट्रवादीचा पर्याय निवडावा लागला, असे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर खडसे हे आज हेलिकॉप्टरने मुंबईला जात आहेत.