जळगाव - जामनेर तालुक्याला गेल्या दोन दिवसात चक्रीवादळासह अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. तालुक्यातील 20 ते 25 गावांना अतिवृष्टीने अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे तालुक्यातील सुमारे 35 हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली असून, 250 घरांची पडझड झाली आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले आहे. कापणीवर आलेल्या केळीच्या बागा आणि पूर्वहंगामी कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, भाजपा नेते, माजीमंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन पाहणी केली.
दोन दिवस होता पावसाचा जोर
अजिंठा डोंगररांगांमध्ये तसेच जामनेर तालुक्यात सोमवारी व मंगळवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. रात्रीही पावसाचा जोर कायम होता. चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. शेतांमध्ये पिके पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांवरची पत्रे उडून गेली तर काही घरांची पडझड झाली आहे. रस्त्यांवरील पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.
'या' गावांना बसला सर्वाधिक फटका
जामनेर तालुक्यातील 20 ते 25 गावांमध्ये अतिवृष्टीमुळे हानी झाल्याचे स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यांमध्ये समोर आले आहे. काही ठिकाणी अजूनही पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील हिंगणे, ओझर खुर्द आणि ओझर बुद्रुक, रामपूर, लहासर, ढालशिंगी, जुनोने, तळेगाव आणि पहूर, टाकळी बुद्रुक, मेणगाव, हिरवखेडा दिगर, देवळसगाव, वडगाव तिघ्रे, वाघारी, तिघ्रे वडगाव, भागदरा, तोंडापूर, शेळगाव, कासली व सावरला या गावांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. या सर्वच ठिकाणी शेती पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून, शेतकऱ्यांच्या हाती आता काहीही लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दुःख मांडताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर
आमदार गिरीश महाजन यांनी आज सकाळपासून जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांना भेटी दिल्या. झालेल्या नुकसानीची पाहणी करत त्यांनी शेतकरी व नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारकडून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी उपाध्यक्ष नंदू महाजन, भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, तहसीलदार अरुण शेवाळे आदी उपस्थित होते. दरम्यान, आपले दुःख मांडताना अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. निसर्गाने सर्व काही हिरावून नेले. आता जगायचे कसे? हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. संसार उघड्यावर आल्याने अनेकांना भावना अनावर झाल्या होत्या.
पंचनामे करण्याचे काम सुरू
नुकसानग्रस्त भागात पाहणी केल्यानंतर आमदार गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले, की गेल्या दोन दिवसात जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जामनेर तालुक्यात चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. केळी, कापूस, मका यासारखी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.
'राज्य सरकारने आता तरी तोंडाला पाने पुसू नयेत'
जळगाव जिल्ह्यात यापूर्वीही यावल, रावेर, मुक्ताईनगर भागात चक्रीवादळामुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यावेळीही पंचनामे झाले. मात्र, अजूनपर्यंत शेतकऱ्यांना एक दमडीही मदत मिळालेली नाही. मागच्याच आठवड्यात चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले. त्या ठिकाणी मदतीची घोषणा झाली. पण नुकसानग्रस्तांना काहीही मिळालेले नाही. राज्य सरकारने किमान आता तरी शेतकरी आणि नुकसानग्रस्त लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करू नये, अशा शब्दात गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.