जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. जळगाव शहरासह भुसावळ व अमळनेर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे मंगळवारपासून ७ दिवसांसाठी जळगाव शहरासह भुसावळ व अमळनेर तालुका पुन्हा लॉकडाऊन करण्याची घोषणा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली. याबाबतचे आदेश शनिवारी पारित करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशानुसार मंगळवार (दि. ७ जुलै) ते सोमवार (दि. १३ जुलै) पर्यंत ७ दिवस जळगाव शहर, भुसावळ व अमळनेर तालुक्यात हे लॉकडाऊन असणार आहे. या काळात औषधी दुकाने, दूध विक्री व खरेदी व्यवहार सुरू राहणार आहेत. मात्र, स्थानिक नागरिकांना त्यांचा रहिवासाचा प्रभाग असणाऱ्या भागातच खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येणार आहेत. साहित्य खरेदी करण्यासाठी दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहन घेवून जाण्यासाठी परवानगी मिळणार नाही. तीन तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत क्षेत्रातच ठोक व घाऊक खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू राहणार आहेत.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत बोलताना... जळगाव शहर महापालिका क्षेत्र, भुसावळ व अमळनेर पालिका क्षेत्रात रहिवास करणारे, ज्यांची शेती या तीन क्षेत्राबाहेर आहे, अशा शेतकऱ्यांना केवळ शेतीविषयक कामे करण्यासाठी, शेतीसाठी लागणारी औषधे बी-बियाणे, किटकनाशके, खत खरेदी करण्यासाठी तसेच ये-जा करण्यासाठी परवानगी आहे. पण यासाठी संबंधितांना आपल्या शेतीचा सातबाराचा उतारा बाळगणे आवश्यक राहील. या शिवाय तीनही क्षेत्रातील सर्व आस्थापना, सर्व दुकाने बंद राहतील.
लॉकडाऊन कालावधीत लग्न समारंभासाठी ५० व्यक्ती मर्यादित उपस्थित राहू शकतील. याची परवानगी स्थानिक प्रशासन व पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक राहील. तर अंत्यविधीसाठी केवळ २० व्यक्तीच उपस्थित राहू शकतील. तीनही तालुका क्षेत्रातील पेट्रोल, डिझेल चालक व मालक यांना सुट देण्यात आलेली आहे. शासकीय वाहनांना शासकीय ओळखपत्र पाहून पेट्रोल-डिझेल विक्री करावे, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा -जळगाव: तरुणाची गळफास घेऊन तर वृद्धाची रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या
हेही वाचा -धक्कादायक; जळगाव जिल्ह्यात 168 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 7 जणांचा मृत्यू