जळगाव- जिल्ह्यात आजपासून दारू विक्रीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात सकाळपासूनच तळीरामांची दारूच्या दुकानांसमोर लांब रांगा लागल्याचे चित्र होते. दुकाने उघडण्यापूर्वीच अनेक जण दारू घेण्यासाठी रांगेत उभे राहिले होते. तब्बल दीड महिन्यांनी दारू मिळणार असल्याने तळीराम खुश आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी दारू विक्रीला सशर्त परवानगी देत असल्याचे जाहीर केल्यानंतर सोमवारी सायंकाळी दारू विक्रेत्यांनी योग्य त्या उपाय योजना करण्यास केल्या. दुकानांसमोर तळीरामांची गर्दी टाळण्यासाठी बांबूची रेलिंग करणे, तळीरामांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी मंडप उभारणे, अशी खास व्यवस्था करण्यात आली होती. सोशल डिस्टन्सिंगसाठी दुकानांसमोर पांढऱ्या रंगाने वर्तुळ आणि चौकोन देखील आखण्यात आले होते. आज सकाळी ११ वाजेपासून दुकाने उघडणार होती. परंतु, तळीरामांनी सकाळी ९ वाजेपासूनच दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या.