जळगाव -शहरापासून जवळच असलेल्या ममुराबाद गावाच्या शिवारात एक बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज (बुधवारी) सकाळी 9 वाजेच्या सुमारास उजेडात आली. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पंचनाम्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या बिबट्याचा मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या बिबट्याची हत्या केल्याचा संशय वन्यप्रेमींनी व्यक्त केला आहे.
ममुराबाद गावापासून काही अंतरावर नांद्रा फाटा आहे. याठिकाणी रस्त्याच्या कडेलाच हा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे शेतात जाणाऱ्या काही शेतमजुरांना हा बिबट्या निपचित अवस्थेत पडलेला दिसला. त्यामुळे ते भीतीने पळून गेले. या घटनेची माहिती ममुराबाद गावात पसरली. त्यानंतर या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी केलेल्या पाहणीत हा बिबट्या मृतावस्थेत असल्याचे स्पष्ट झाले.
घटनास्थळी बघ्यांची उसळली गर्दी-
बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. गर्दीमुळे पंचनामा करताना अडचणी येत असल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गर्दी पांगवण्यासाठी प्रयत्न करावे लागले. काही तरुण याठिकाणी हुल्लडबाजी करत होते.
बिबट्यावर विषप्रयोग केल्याचा संशय-
दरम्यान, या बिबट्यावर विषप्रयोग करून त्याला ठार केल्याचा संशय वन्यप्रेमींनी व्यक्त केला आहे. मृतावस्थेत असलेल्या बिबट्याला याठिकाणी आणून टाकल्याची शक्यता आहे. कारण ममुराबाद शिवारात आजपर्यंत बिबट्या आढळून आल्याची एकही घटना घडलेली नाही. अशा परिस्थितीत थेट बिबट्या मृतावस्थेत आढळून येणे संशयास्पद असल्याचे वन्यप्रेमींचे म्हणणे आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यात आली पाहिजे, अशीही मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.