जळगाव - जिल्ह्यात यावर्षी भीषण दुष्काळ आहे. या दुष्काळाचा फटका गिरणा तसेच अंजनी नदी पट्ट्यात असलेल्या लिंबू बागांना बसला आहे. पाण्याअभावी लिंबू बागा करपू लागल्याने यावर्षी लिंबूच्या उत्पन्नात मोठी घट आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी दरवर्षी जून-जुलैपर्यंत लिंबूचे उत्पन्न निघत होते. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी मे अखेरीसच लिंबूचा हंगाम आटोपून गेला आहे.
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तसेच भडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात लिंबूच्या बागा आहेत. उन्हाळ्यात लिंबूला मोठी मागणी असल्याने दरवर्षी शेतकऱ्यांना उन्हाळ्यात लिंबूचे भरघोस उत्पन्न होते. गेल्या वर्षी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने नद्या-नाले तसेच विहिरींनी फेब्रुवारी-मार्च महिन्यातच तळ गाठला. यामुळे यावर्षी लिंबूचे अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना मिळालेले नाही.
एरंडोल तालुक्यातील तळई तसेच उत्राण परिसर हा लिंबू बागांचा परिसर मानला जातो. या परिसरात शेतकरी मोठ्या प्रमाणावर लिंबूचे उत्पादन घेतात. येथे पिकणाऱ्या लिंबुंना मुंबई, वाशी, भिवंडीसह थेट गुजरात राज्यातील व्यापाऱ्यांची मागणी असते. स्थानिक बाजारपेठेतदेखील येथील लिंबूला मागणी असते. मात्र, पाण्याअभावी लिंबुच्या हिरव्या बागा करपल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.