जळगाव -स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लाखो रुपयांचा गुटखा वाहून नेणारा एक ट्रक पकडला आहे. मंगळवारी (11 ऑगस्ट) रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ट्रकसह सुमारे 23 लाख 33 हजार 880 रुपयांचा गुटखा तसेच पान मसाल्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
धरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक ट्रक लाखो रुपयांचा गुटखा तसेच पान मसाल्याचा साठा घेऊन जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी धरणगाव शहराजवळ रस्त्यावर सापळा लावला होता. रात्री उशिरा एक ट्रक धरणगावातून जात असताना पोलिसांनी त्याला अडवले. त्यानंतर ट्रकमध्ये काय आहे, म्हणून चालकाला विचारणा केली असता त्याने, उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, त्यानंतर पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता क्रेटमधून गुटखा तसेच पान मसाल्याचा साठा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ट्रक, गुटखा आणि पान मसाल्याचा साठा जप्त केला. त्याचप्रमाणे, शेख रफिक शेख रज्जाक व कपिल रवींद्रसिंग राजपूत यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या गुटखा व पान मसाल्याची किंमत सुमारे 23 लाख 33 हजार 880 रुपये इतकी आहे.