जळगाव -मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. एनसीबीचे पथक क्रूझवर कारवाई करत असताना बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबत सेल्फी घेणारा एनसीबीचा वादग्रस्त पंच किरण गोसावी याने फरार असताना जळगावात काही काळ मुक्काम केल्याची माहिती समोर आली आहे. किरण गोसावीने जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आणि अमळनेर येथे मुक्काम केल्याचे सांगितले जात आहे. गोसावीला पुण्यात अटक केल्यानंतर त्याच्या वास्तव्याबाबात माहिती देताना पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी जळगावचा उल्लेख केल्यामुळे या चर्चेला अधिक उधाण आले आहे.
पुणे पोलीस आयुक्तांनी काय दिली माहिती?
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी 28 ऑक्टोबरला घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, पहाटेच्या सुमारास कात्रजमधील मांगेवाडीतील एका लॉजमधून किरण गोसावी याला सापळा रचून अटक करण्यात आली. दरम्यान, गोसावी कुठे आणि कसा कसा फिरला? याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, गोसावी गेल्या 10 दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. लखनऊ, फतेहपूर, तेलंगणा, जबलपूर, जळगाव, मुंबई, पनवेल, लोणावळा या ठिकाणी तो फिरल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व ठिकाणी पुणे पोलिसांच्या टीम गेल्या होत्या, असे गुप्ता म्हणाले होते. त्यामुळे किरण गोसावीच्या जळगाव कनेक्शनबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.