महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'फडणवीस... तुम्ही आज म्हणताय एकत्र बसू, तेव्हा का म्हटले नाही'; खडसेंचा जोरदार पलटवार

भाजपा नेते एकनाथ खडसे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद वाढतच आहे. देवेंद्र फडणवीस आज एकत्र बसून चौकशी करु म्हणतात. ही भूमिका यापूर्वी का राबवली नाही, असा सवाल त्यांनी फडणवीस यांना विचारला आहे. फडणवीस यांनी आज घरची धुणी रस्त्यावर धूत नाही, असे म्हटले होते याला खडसेंनी प्रत्युत्तर दिले आहे. भोसरी येथील एक इंचही जमीन माझ्या नावावर नाही. दाऊद प्रकरणामुळे राजीनामा घेण्यात आला. फडणवीस हॅकरला का भेटले, असा सवालही खडसेंनी विचारला आहे.

eknath khadse- fadnavis
एकनाथ खडसे-देवेंद्र फडणवीस

By

Published : Sep 11, 2020, 8:01 PM IST

जळगाव-माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत वरिष्ठांकडे जाणार आहे. तक्रारी करणार आहे, अशी भूमिका मी घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आज म्हणताय की यासंदर्भामध्ये सर्व तक्रारींची आम्ही एकत्र बसून चौकशी करू. परंतु, हेच धोरण जर तुम्ही याआधी ठरवले असते तर मला महाराष्ट्राच्या जनतेसमोर म्हणणे मांडायची गरज भासली नसती, अशा शब्दांत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा पलटवार केला आहे.

एकनाथ खडसे यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायामागे देवेंद्र फडणवीस यांचा प्रत्यक्ष हात असल्याचा आरोप करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. खडसे सतत टीका-टिप्पणी करत असल्याने फडणवीस यांनी आज पहिल्यांदा त्यांच्या टिकेला उत्तर देताना 'मी खूप संयमी आहे. घरची धुणी रस्त्यावर धूत नाही', असे सांगितले. त्यानंतर लगेचच एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर पलटवार केला. खडसे मुक्ताईनगर येथे त्यांच्या फार्महाऊसवर पत्रकारांशी बोलत होते.

एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर पलटवार

हेही वाचा-कंगनाच्या चाहत्याची संजय राऊत यांना धमकी; पश्चिम बंगालमधून अटक

देवेंद्र फडणवीस आता म्हणताहेत की एकनाथ खडसे यांचा राजीनामा दाऊद प्रकरणामुळे नाही तर जमिनीच्या प्रकरणात घेतला आहे. परंतु, मी एक इंचही जमीन घेतलेली नाही. जी जमीन घेतली ती माझ्या पत्नीने आणि जावयाने घेतली आहे. आजही त्या जमिनीच्या मूळ सातबाऱ्यावर आजही मूळ मालकाचे नाव आहे, असे प्रत्युत्तर खडसे यांनी फडणवीस यांना दिले. सातबाऱ्यावर इतर हक्क म्हणून एमआयडीसीचे नाव असून ते 2010 मध्ये लागले आहे. एमआयडीसीने 50 वर्षांपूर्वी ही जमीन द्यावी म्हणून फक्त एक पत्र दिलेले होते. त्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. एक नोटीस पण त्यांना देण्यात आली नाही. जमिनीच्या संपादनाचा मोबदला दिलेला नाही. अशी जमीन एमआयडीसीची कशी झाली,असा सवाल खडसे यांनी विचारला आहे.

महसूल मंत्री म्हणून काम केले असल्याने मला काही कायदे माहिती होते. एखादी जमीन वादग्रस्त असेल तर सब रजिस्ट्रारकडे खरेदीचा व्यवहार करता येतो. ही जमीन खरेदी करताना नियमानुसार कर भरण्यात आला. मात्र, या व्यवहाराशी माझा संबंध जोडला गेला. त्यानंतर हेतुपुरस्सर मला छळण्यात आले. याबाबत झोटिंग समितीचा अहवाल आला. या अहवालाबाबत मी विधानसभेत वारंवार मागणी केली. माझा गुन्हा काय ते सांगा म्हणून विनंती केली. मग तेव्हा विधानसभेत बोलायला काय हरकत होती. अन्य लोकांना तुम्ही क्लीन चीट दिली तेव्हा मला का दिली नाही? असा प्रश्नही खडसेंनी फडणवीस यांना केला आहे.

माझा राजीनामा 'दाऊद' प्रकरणातच घेतला-

जेव्हा दाऊद प्रकरण समोर आले, त्यावेळी मला राजीनामा देण्यास सांगण्यात आले. या प्रकरणामुळे पार्टीची बदनामी होत असल्याचे कारण सांगितल्याने मी तेव्हा राजीनामा दिला. मात्र, मनीष भंगाळे हा हॅकर होता. तो गुन्हेगार असल्याने त्याला अटक का केली नाही, त्याच्यावर गुन्हा का दाखल केला नाही. एवढेच नव्हे तर त्याची कृपाशंकर यांच्यासोबत त्याची भेट का घेतली? असे सवाल खडसेंनी पुन्हा फडणवीसांना विचारले आहेत. दरम्यान, माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत मी विधानसभेत स्पष्टीकरण मागत असताना तेव्हाच ते दिले नाही. मग शेवटी मला महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता, असेही खडसेंचे म्हणणे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details