जळगाव - अक्षय तृतीयेनिमित्त जळगाव जिल्ह्यातील पिंप्राळा, मेहरूण या उपनगरांसह रावेर शहरात बारागाड्या ओढण्याचा लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जळगावातील पिंप्राळा आणि मेहरूण परिसरात भवानी मातेच्या यात्रोत्सवात तर रावेरात मुंजोबा देवाच्या यात्रोत्सवात भगतांकडून बारागाड्या ओढल्या जातात. या लोकोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे. त्यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेने या लोकोत्सवात सहभागी होऊन आनंदाची अनुभूती घेतात.
पिंप्राळ्यातील लोकोत्सवाचे ५० वे वर्ष -
पिंप्राळ्यातील बारागाड्या ओढण्याच्या लोकोत्सवाला ४९ वर्षांची परंपरा लाभली आहे. १९७० पासून हा लोकोत्सव साजरा होत आहे. कै. भावडू टिंभा चौधरी यांनी या उत्सवाला सुरुवात केली होती. ती प्रथा आजही कायम आहे. गेल्या ९ वर्षांपासून भगत हिलाल बोरसे हे बारागाड्या ओढत आहेत. या उत्सवाच्या पूर्वसंध्येला हिलाल बोरसे यांच्या घरी भगतकाठीची स्थापना करण्यात येते. त्यानंतर रात्री १२ वाजता परिसरातील सर्व देवांची पूजा करून त्यांना उत्सवात आमंत्रित करण्यात येते. या उत्सवाची महिनाभरापासून तयारी सुरू असते.
भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त सुरुवातीला ध्वजकाठीचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर भगत हिलाल बोरसे यांच्यासह भक्तांनी ध्वजासोबत भवानी मातेच्या मंदिराला अकरा प्रदक्षिणा घालून बारागाड्या ओढण्यास सुरुवात केली.
मेहरूणच्या लोकोत्सवाला दीडशे वर्षांची परंपरा -
मेहरुण उपनगरात भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त दरवर्षी अक्षय तृतीयेला बारागाड्या ओढण्याचा उत्सव पार पाडतो. या लोकोत्सवाला दीडशे वर्षांची परंपरा लाभली आहे. १९३० मध्ये कै. बहिराम रावजी वाघ या भक्ताने प्रथम बारागाड्या ओढण्यास सुरूवात केली. त्यांच्यानंतर वंशपरंपरेने दिवंगत बळीराम वाघ, दिवंगत रामदास वाघ आणि आता भगत मधुकर रामदास वाघ हे बारागाड्या ओढतात. भवानी मातेच्या मंदिरात अभिषेक करून, विडा ठेवून बारागाड्यांच्या मिरवणुकीस सुरूवात करण्यात आली.
रावेरात बारागाड्या उत्सवामुळे चैतन्य-
अक्षय्य तृतीयेनिमित्त रावेर शहरातील शिवाजी चौक परिसरात मुंजोबा महाराजांच्या यात्रोत्सवात बारागाड्या ओढण्याचा उत्सव साजरा झाला. या उत्सवाला सुमारे १५० वर्षांची परंपरा लाभली आहे. भगत बाळू रामदास महाजन हे २१ वर्षांपासून बारागाड्या ओढत आहेत. त्यांना दीपक रमेश पाटील व पुरुषोत्तम लक्ष्मण महाजन साथ देतात. हा उत्सव पाहण्यासाठी जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर, खंडवा येथून भाविक रावेरात दाखल होतात.