जळगाव -लॉकडाऊनच्या काळात शहरातील अजिंठा चौफुली परिसरातील आर. के. वाईन शॉपमधून बेकायदेशीरपणे मद्याची तस्करी होत असल्याने १२ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारुन हा प्रकार हाणून पाडला होता. दरम्यान, वाईन शॉपचा मालक दिनेश नोतवाणी याच्या संपर्कात अनेक पोलीस कर्मचारी व काही पोलीस अधिकारी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्वांची चौकशी करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी एसआयटी स्थापन केली आहे. ही समिती प्रकरणाची सविस्तर चौकशी करत असून, संशयाच्या भोवऱ्यातील पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
जळगावातील मद्य तस्करी प्रकरणात पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग? पोलीस अधीक्षकांच्या विशेष समितीकडून चौकशी सुरू
लॉकडाऊनच्या काळात शहरातील अजिंठा चौफुली परिसरातील आर. के. वाईन शॉपमधून बेकायदेशीरपणे मद्याची तस्करी होत असल्याने १२ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारुन हा प्रकार हाणून पाडला होता.
पोलीस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या एसआयटी समितीने नोतवाणी याच्या मोबाईलमधून काही व्हाईस रेकॉर्डिंग प्राप्त केल्या असून त्यात अनेक खळबळजनक पुरावे हाती लागले आहेत. चौकशी सुरू असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना प्रश्नावली देण्यात आली आहे. चौकशी दरम्यान त्यांनी खरे बोलावे, यासाठी हा फंडा वापरण्यात आला आहे. दिनेश नोतवाणी यांच्या पत्नीच्या नावावर हे वाईन शॉप आहे. दरम्यान, राजकीय पदाधिकारी, पोलिसांचा ‘आशीर्वाद’ असल्यामुळे नोतवाई याने थेट लॉकडाऊनचा नियम मोडून पहाटेच्या वेळी मद्य तस्करी सुरू केली होती. हा प्रकार १२ एप्रिल रोजी उघडकीस आला. दरम्यान, यानंतरही कठोर कारवाई करू नये म्हणून नोतवाणी याचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी अनेक पोलीस कर्मचाऱ्यांशी त्याने संपर्क साधला होता. तर काही कर्मचारी स्वत:हून त्याच्या संपर्कात आले होते. हा प्रकार चांगलाच चर्चेत आल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी थेट पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांच्यासह १० अधिकारी, कर्मचाऱ्यांची विषेश एसआयटी समिती स्थापन केली.
या समितीने २ दिवसात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे दीपक चौधरी, रवींद्र चौधरी, विजय नेरकर, जितेंद्र राजपूत, तालुका पोलीस ठाण्याचे भरत पाटील, मुख्यालयातील मनोज सुरवाडे, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे रवी नरवाडे, आर्थिक गुन्हे शाखेचे जीवन पाटील या ८ पोलीस कर्मचाऱ्यांचे लेखी जबाब घेतले आहेत. हे कर्मचारी नोतवाणी याच्या संपर्कात असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्या अनुषंगाने चौकशी केली जात आहे.