जळगाव -शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये राजकीय सत्तासंघर्ष सुरूच आहे. जळगाव शहराला देण्यात आलेली रुग्णवाहिका शिंदे समर्थकानी परत मागून घेतली होती. पण, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेनेनं दोन नवीन रुग्णवाहिका दिल्या आहेत.
शिंदे सेनेने रुग्णवाहिका घेतली परत, शिवसेनेने नवीन दिली! फुटीनंतर आता त्याचे पडसाद - शिंदे गटाने बंडखोरी करून आपली वेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये संघर्ष पेटला आहे अशातच कोरोना काळात रुग्णांना अत्यावश्यक सेवेच्या विचाराने महानगर शिवसेनेला डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षभरापूर्वी रुग्णवाहिका देण्यात आली होती. मात्र, शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आता त्याचे पडसाद उमटू लागले असून महानगर शिवसेनेला देण्यात आलेली ही रुग्णवाहिका शिंदे गटाने परत मागून घेतली होती. त्यामुळे शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
रुग्णवाहिकेचे लोकार्पण -जळगाव शहराला देण्यात आलेली रुग्णवाहिका शिंदे समर्थकानी परत मागून घेतली होती. जळगाव शिवसेनेला हा विषय जिव्हारी लागल्याने दोन दिवसात त्यांनी नवीन रुग्णवाहिका तयार केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. तर जळगाव महानगरपालिकेच्या समोर शिवसैनिकांची नोंदणी अर्ज ही भरण्यात आले. या प्रसंगी महापौर जयश्री महाजन, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे, सुनील महाजन, नितीन लढ्ढा आदी उपस्थित होते.
रुग्णसेवेसाठी दोन रुग्णवाहिका - शिवसेनेत बंड करत एकनाथ शिंदेंसह ४० आमदार बाहेर पडले होते. यात जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले होते. शिंदे गट व भाजपचे युतीतील सरकार स्थापन झाले. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यातून आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्हा रुग्णालयाला रुग्णवाहिका देण्यात आली होती. मात्र ते शिंद गटात सहभागी झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी ही रुग्णवाहिका शिवसेनेकडून काही दिवसांपूर्वी परत मागून घेतली होती. नागरिकांच्या आरोग्याच्या मुद्द्यावरही राजकारण झाल्याने गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीकाही करण्यात आली होती. जिल्हा रुग्णालयाला देण्यात आलेली रुग्णवाहिका शिंदे गटाने परत घेतल्याने ही बाब उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिकांना जिव्हारी लागल्याचे दिसून आले. शिंदे गटाच्या जिद्दीवर शिवसेनेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्ह्यात रुग्णसेवेसाठी दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले आहे. जळगाव शहरातील महापालिकेसमोर रुग्ण्वाहिका लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, महापौर जयश्री महाजन, जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, उपमहापौर कुलभुषण पाटील, महानगराध्यक्ष शरद तायडे, आदी उपस्थित होते. रुग्नवाहिकेच्या याच विषयावरून आता जळगावात शिंदे गट व उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिकांमध्ये जोरदार लढाई जुंपली आहे.
तुम्ही काय एक रुग्णवाहिका परत घेता - आम्ही दोन रुग्णवाहिका जळगाव शहराच्या रुग्णसेवेसाठी दिल्या आहेत, अशा शब्दात शिवसेना उपमहानगरप्रमुख प्रशांत सुरळकर यांनी शिंदे गटाला डिवचले आहे. आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका परत घेण्यात आली होती. त्यामुळे शिवसैनिक चिडले आहेत. शिवसैनिकांना चिडवाल, तर ते उसळी घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही एक परत घेतली, आम्ही दोन रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी दिल्या. शिंदे गट आरोग्याच्या बाबतीतही गलिच्छ राजकारण करत असल्याची टीका शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केली आहे.