महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावातील प्राथमिक आरोग्य केंद्रे बनली कोंडवाडे; ग्रामीण भागात आरोग्य सेवेचा बोजवारा - officer

दोन वैद्यकीय अधिकारी इथे नेमणुकीस आहेत. त्यापैकी एक आरोग्य अधिकारी कायम दौऱ्यावर तर एक आरोग्य केंद्रात थांबतो. आपत्कालीन सेवा असल्याने अधिकाऱ्यांना मुख्यालयात थांबणे सक्तीचे असताना मात्र, दोन्हीही वैद्यकीय अधिकारी हे जळगावहून ये-जा करतात, ही वस्तुस्थिती आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रे बनली कोंडवाडे

By

Published : May 10, 2019, 7:31 PM IST

जळगाव - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत चालवले जाणारे प्राथमिक आरोग्य केंद्रे अक्षरशः कोंडवाडे बनले आहेत. आरोग्य केंद्रांचे अधिकारी व कर्मचारी तसेच औषधांवर शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च होत असताना ग्रामीण भागातील लोकांना मात्र, या आरोग्य केंद्रांमधून कोणत्याच प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याने ही आरोग्य केंद्रे कुचकामी ठरत आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्रे बनली कोंडवाडे

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची माहिती जाणून घेतली असता ही धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोग्य केंद्रांमध्ये योग्य सुविधा मिळत नसल्याची तक्रार सातत्याने केली जाते. परंतु, शासनाकडून दखल घेतली जात नसल्याचे वादत्व आहे. जळगाव जिल्ह्यातील कानळदा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राची सद्यस्थितीत अतिशय बिकट अवस्था झाली आहे. या आरोग्य केंद्रात सुविधा मिळत नसल्याने हे आरोग्य केंद्र असून नसल्यासारखे आहे. या आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाल्याने भिंतींना तसेच छताला मोठे तडे गेले आहेत. रुग्णांच्या सोयीसाठी असलेले बेडदेखील फाटले आहेत. पुरेसा औषधांचा साठा नाही. या प्राथमिक आरोग्य केंद्राला परिसरातील २७ गावे जोडण्यात आली आहेत. सुमारे ४४ हजार लोकसंख्येचे आरोग्य या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भरवशावर आहे. मात्र, आरोग्य केंद्रच आजारी असल्याने जनतेला आरोग्य सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. रात्री-अपरात्रीला महिलांची प्रसूती, आजारपण त्याचप्रमाणे कोणाला सर्प किंवा विंचू चावला तर आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नाहीत. एक शिपाई तसेच एका परिचारिकेच्या भरवशावर रात्री आरोग्य केंद्राचा कारभार चालतो. यामुळे काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर ग्रामस्थांना आरोग्य केंद्रात रुग्ण दाखल करून त्याचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा खासगी रुग्णालयात उपचारासाठी धाव घ्यावी लागते. दुष्काळाच्या स्थितीत ग्रामस्थांना यामुळे नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे.

या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दोन वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ, परिचारिका, शिपाई, रुग्णवाहिका चालक अशा एकूण २५ ते ३० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र, मोजकेच कर्मचारी आरोग्य केंद्रात उपस्थित राहत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. दोन वैद्यकीय अधिकारी इथे नेमणुकीस आहेत. त्यापैकी एक आरोग्य अधिकारी कायम दौऱ्यावर तर एक आरोग्य केंद्रात थांबतो. आपत्कालीन सेवा असल्याने अधिकाऱ्यांना मुख्यालयात थांबणे सक्तीचे असताना मात्र, दोन्हीही वैद्यकीय अधिकारी हे जळगावहून ये-जा करतात, ही वस्तुस्थिती आहे. आरोग्य केंद्राच्या आवारातील सरकारी निवासस्थानांची स्थिती राहण्यायोग्य नसल्याने आम्हाला नाईलाजाने ये-जा करावे लागत आहे, असे उत्तर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून ऐकायला मिळते.

ग्रामीण रुग्णालयांमध्ये ज्या प्रमाणे तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली असते, त्याचप्रमाणे मोठे कार्यक्षेत्र असलेल्या आरोग्य केंद्रांनाही त्याच धर्तीवर सुविधा दिल्या गेल्या पाहिजे. असे केले तर जनतेला चोवीस तास वैद्यकीय सुविधा देता येतील असेही आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी खासगीत सांगतात. त्या दृष्टीने काही उपाययोजना करता येतील का? याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details