जळगाव - जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात आता शक्तिशाली कॅमेरा असलेला 'ड्रोन' दाखल झाला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या उपस्थितीत पोलीस कवायत मैदानावर ड्रोनची यशस्वी चाचणी घेण्यात आली. शहरातील संवेदनशील ठिकाणांवर आणि कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक कार्यालयाने सर्वच जिल्हा पोलीस दलांना ड्रोन कॅमेरे उपलब्ध करून दिले आहेत.
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात 'ड्रोन कॅमेरा' दाखल हेही वाचा...'ती' बातमी साफ खोटी, कोरोनामुळे राज्याचे जिल्हानिहाय 'झोन' केलेले नाहीत - विश्वजीत कदम
जिल्हा पोलीस दल पूर्वीपासूनच 'पीटीझेड' कॅमेरा असलेल्या वाहनांनी सज्ज आहे. आता पोलीस दलाच्या ताफ्यात नव्याने शक्तिशाली कॅमेरा असलेले ड्रोन दाखल झाले आहेत. या ड्रोनद्वारे संवेदनशील ठिकाणांची निगराणी करण्यात मोलाची साथ पोलीस दलास लाभणार आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता पोलीस दलास संक्रमित झालेल्या परिसरावर नजर ठेवण्यात याचा जास्तीत जास्त उपयोग करता येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी या ड्रोन कॅमेऱ्याची पोलीस कवायत मैदानावर यशस्वी चाचणी घेतली असून, पोलीस दलाच्या तांत्रिक टिमला हे ड्रोन सोपवण्यात आले आहे.