जळगाव - शहरात संचारबंदी आदेशाचे सर्रासपणे उल्लंघन सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाला लढा देण्यासाठी राज्य सरकारने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असताना नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे कारवाईसाठी आता पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर लाठीचार्ज केला जात आहे. त्याचप्रमाणे मोठ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे.
नागरिकांनी संचारबंदीचे पालन करा, जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन कोरोना विषाणूचा अटकाव होत नसल्याने राज्य सरकारने राज्यभरात निवासी भागात कलम 144 नुसार संचारबंदी लागू केली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने, कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, नागरिकांना कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा...जान है तो जहान है... आज मध्यरात्रीपासून २१ दिवस देश लॉकडाऊन - पंतप्रधान मोदी
जळगाव शहरात सलग दुसऱ्या दिवशी सकाळी अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंसह इतर दुकाने उघडी होती. तर नागरिक देखील कोणत्याही ठोस कारणाविना घराबाहेर पडत होते. त्यामुळे काही ठिकाणी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना लाठ्यांचा प्रसाद देत पिटाळून लावले. दरम्यान, राज्य सरकारने जमावबंदी आदेश लागू करत केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी दिली आहे. त्यामुळे मेडिकल, दूध डेअरी, किराणा सामुग्रीची दुकाने उघडी होती. इतर सर्व मार्केटमधील दुकानांचे शटर डाऊन होते.
अन्यथा कठोर कारवाई :
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, नागरिक अजूनही ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशा इशारा देखील जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला आहे. दरम्यान, भाजीपाला, दूध तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आधीप्रमाणे सुरू आहे, त्यामुळे नागरिकांनी नाहक घाबरून जाऊ नये, असेही त्यांनी सांगितले.