जळगाव- जिल्हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढीतील ५० लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला होता. या बेहिशोबी रकमेच्या व्यवहारप्रकरणी दोघांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनील सूर्यवंशी व किरण पाटील अशी दोन्ही आरोपींची नावे असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दोघांना अटक केली होती.
१४ जुलै २०१२ ते १ ऑक्टोबर २०१६ या काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पतपेढीचे अध्यक्ष असलेले सुनील सूर्यवंशी तसेच विभागीय अधिकारी किरण पाटील यांनी संगनमत करून सोसायटीतच बनावट खाते उघडले होते. या खात्याच्या माध्यमातून दोघांनी ५० लाख रुपयांच्या बेहिशेबी रकमेचा व्यवहार केला होता. या व्यवहारात त्यांनी खात्यात टाकलेली रक्कम व्याजासह काढून घेत पतपेढीची फसवणूक केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पतपेढीचे माजी संचालक रावसाहेब पाटील यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान १० जून रोजी खंडपीठाने या प्रकरणात प्रथमदर्शनी दोषी आढळणारे सुनील सूर्यवंशी तसेच किरण पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची चौकशी केली. त्यात दोघेही गैरव्यवाह केल्याप्रकणी दोषी आढळल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना बुधवारी अटक करत यांच्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. दोघांना गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सरकार तसेच आरोपी पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेत दोघांना २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.