जळगाव- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. 3 मे रोजी संपुष्टात येणारा लॉकडाऊन 2 आठवड्यांसाठी पुढे वाढवण्यात आला आहे. त्यामुळे विविध ठिकाणी अडकलेले भाविक, विद्यार्थी, कामगार तसेच मजुरांसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी राज्यासह केंद्राला दिले आहे.
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांसाठी प्रभावी उपाययोजना हव्यात; खासदार उन्मेष पाटलांचे राज्यासह केंद्राला साकडे - जळगाव कोरोना अपडेट
विविध ठिकाणी अडकलेले भाविक, विद्यार्थी, कामगार तसेच मजुरांसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी राज्यासह केंद्राला दिले आहे.
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याने लॉकडाऊन पुढे वाढवण्यात आला आहे. त्यामुळे लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र, त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत राज्यात लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी, आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी घ्यायची, जिल्ह्यात आल्यावर वैद्यकीय तपासणी करून घ्यायची आणि गरज असल्यास क्वारंटाईन व्हायचे, अशी प्रक्रिया सुरू आहे. मात्र, एकीकडे परवाने वितरित करायचे आणि दुसरीकडे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी, भाविक, मजूर आणि सर्वसामान्य नागरिक कसे घरी परत येतील? त्यांच्याकडे कोणतीही व्यवस्था नाही. ही बाब लक्षात घेतली पाहिजे. सरकारने लॉक डाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना सोडवण्यासाठी पंतप्रधान सहायता निधी, मुख्यमंत्री सहायता निधीचा उपयोग केला पाहिजे, अशी मागणी देखील उन्मेष पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, लॉकडाऊन पुढे दोन आठवडे वाढल्याने अडकून पडलेल्या लोकांना सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा लोकांच्या संतापाचा उद्रेक होईल, ही बाब लक्षात घेऊन कार्यवाही झाली पाहिजे, अशी मागणी देखील उन्मेष पाटील यांनी केली आहे.